आजोबा
“आजोबा,
तुमच्या वेळी टिव्ही नव्हता? मग तुमचा वेळ कसा हो जायचा?" नातवाने प्रश्न
विचारला.
“अरे
बाळा, आमच्या
वेळी टिव्ही तर नव्हताच पण सिनेमाही रंगीत नसायचा.” आजोबांनी
उत्तर दिलं.
“मग
तुम्हाला कंटाळा नाही यायचा असा एकरंगी सिनेमा पाहताना?”
“नाही.
अजीबात नाही. कारण सिनेमा पहायला आम्ही आईबाबांबरोबर, भावंडांबरोबर किंवा मित्रांबरोबर
जायचो. त्यांच्या सहवासाची आम्हाला इच्छा असायची. सिनेमा तर काय फक्त एक 'कारण’ असायचं. आणि सिनेमेही
कुठले माहिती आहे का तुला बाळा? 'हरीदर्शन', 'रामायण', 'महाभारत' अशी नावं असलेले पौराणिक
सिनेमे किंवा 'वीर
शिवाजी', 'झांसी
की रानी', 'महाराणा
प्रताप' असे
ऐतिहासीक सिनेमे पाहण्याचीच आम्हाला परवानगी होती. मित्रांबरोबर कधी सिनेमाला
जायचं असेल तर आधी आईबाबांची परवागनी काढावी लागायची. आधी ते आपापल्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना त्या
सिनेमाबद्दल विचारायचे. आणि त्यांची खात्री पटली की सिनेमा मुलांनी बघण्याच्या
लायकिचा आहे की मगच ते आम्हाला परवागनी आणि तिकिटाचे पैसे द्यायचे."
“क्काय? तुमच्या वेळी स्टिरिओफोनिक
साउंड, थ्री
डी, डॉल्बी
वगेरे काहीच नव्हतं?”
“अजिबात
नव्हतं.”
“हाऊ
बोअरिंग आजोबा! आणखी कुठल्या कुटल्या गोष्टी तुमच्या वेळी नव्हत्या?”
“थांब
हं बाळा. मला थोडा विचार करू दे. हं,
आता आठवलं. आमच्या वेळी टिव्ही नव्हता, बॉल पॉइंट पेनं नव्हती.
पेनिसिलीनचा शोध लागलेला नव्हता. झेरॉक्स कॉपीच्या ऐवजी आम्हाला दुकानातून 'ट्रू कॉपी' नावाची छापील प्रमाणपत्रं विकत
घ्यावी लागायची आणि त्यात हातांनी मार्क किंवा मूळ प्रमाणपत्रावर जे काही लिहिलं
आहे ते लिहावं लागायचं. कॉन्टॅक्ट लेन्स नव्हत्या. कितीही चेहरा खराब दिसला तरी
चष्माच वापरावा लागायचा. आमच्या वेळी क्रेडिट कार्डही नव्हती. सगळ्या वस्तू आधी
पैसे दिले की मगच हातात पडायच्या. घरात वातानुकूल यंत्रही नव्हती. फार उकाडायला
लागलं की घराबाहेर अंगणात जावून बसावं लागायचं. भांडी घासायची आणि कपडे धुवायची
यंत्रही नव्हती. भांडी हाताने घासावी लागायची, कपडे हाताने धुवावे लागायचे आणि घराबाहेरच्या
दोरिवर ताज्या हवेत वाळत टाकावे लागायचे. माणूसही चंद्रावर जावून पोहोचला नव्हता.
तुझी आजी आणि मी आधी लग्नं केलं आणि मग आयुष्यभर एकमेकांबरोबर गुण्यागोविंदाने राहिलो.
आत्तासारखं आमच्या वेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तिला हाक मारताना 'बॉस', 'हॅलो' किंवा 'हाय' असं आम्ही म्हणायचो नाही. मी
वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत प्रत्येक अनोळखी व्यक्तिला 'काका', 'साहेब', 'ताई', 'वहिनी', 'आजोबा' किंवा 'काकू' अशी हाक मारायचो. पुढे मोठा
झाल्यावरही प्रत्येक गणवेषातल्या व्यक्तिला 'साहेब' अशी हाक मारायचो. आमच्या वेळी
समलिंगी लोकांच्या हक्कांसाठी कोणीही उठाव करत नव्हते. त्या विषयावर सिनेमेही येत
नसत. संगणक तर नव्हताच पण बेबी सिटिंगही नव्हतं आणि कोणिही डिप्रेशन आलं म्हणुन भरपूर
पैसे भरून उपचार करत नसत. त्यापेक्षा रजा घेवून गावी जाणं आम्हाला पसंद होतं.
कुठलाही निर्णय घेताना आईबाबांनी शिकवलेली तत्वं आणि आजपर्यंतचा अनुभव ह्यांचा
विचार करून निर्णय घेतला जायचा. जर स्वतःच्या हातून चूक झाली असेल तर त्याची पुर्ण
जबाबदारी घ्यावी लागायची. आमच्या वेळी लष्करातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत नसे.
तेव्हा देशासाठी लढणं आणि प्राण देणं ह्या फार मोठ्या गोष्टी समजल्या जायच्या.
सगळं गाव जवानाच्या घरी येवून त्याला श्रध्दांजली देत असे. आमच्या वेळी 'रिलेशनशीप' हा हाब्द आतासारखा फार वापरला
जात नसे. तेव्हा कोणीही त्याला कसं 'फील
झालं' हे
सांगत नसे. भावंडांबरोबर आणि मित्रांबरोबर नीट जमतं आहे ना मग झालं असा विचार
प्रत्येक जण करत असे.”
“आमच्या
वेळी एफ.एम. रेडिओ नव्हते. साध्या रेडिओवर चांगली गाणी ऐकयला मिळायची. ढग गडगडले, विजांचा कडकडाट झाला की
रेडिओमधे खरखर व्हायची. आमच्या वेळी टेप रेकॉर्डर, सीडी,
लेसर ह्या गोष्टी नव्हत्या पण आमच्या वेळी कानात डून
घालणारे पुरूषही नव्हते. आमच्या वेळच्या नट्या अंगप्रदर्शन करण्याऐवजी अप्रतीम
नुत्य करायच्या आणि फक्त चेहऱ्याने अभिनय करायच्या. तेव्हा 'दस रुपये मे सब कुछ’ असा
बाहेर मोठा फलक लावलेली दुकानं असायची त्यातली प्रत्येक वस्तू फक्त १० रुपयांना
मिळायची. एका रुपयांत मूठभर लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या. पोष्ट कार्ड १० पैशात
आणि पोष्टाचं पाकीट फक्त २५ पैशात भारताच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायचं.
ज्या ज्या गोष्टीवर 'मेड
इन जापान' असं
लिहिलं असायचं ती गोष्ट हलक्या प्रतिची समजली जायची. त्या वेळी 'एड' चा अर्थ होता मदत, 'हार्डवेअर' चा अर्थ होता लोखंडाच्या
वस्तू, 'चीप' म्हणजे हलक्या किंमतीची वस्तू
किंवा लाकडाचा तुकडा आणि 'सॉफ्टवेअर' हा शब्दच तेव्हा नव्हता.
आजच्यासारखा तेव्हा टिव्ही आणि रेडिओवर २४ तास धांगडधिंगा चाललेला नसायचा. रेडिओवरची
गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी घरातल्या बायकांनी गायलेली गाणीच तेव्हा
ऐकायला
मिळायची. कायद्याने समलिंगी संबंधाना मान्यता
नव्हती आणि कुठलीही मुलगी 'अभिमानाने' कुमारी माता होवून मुलांना वाढवत
नसे. तेव्हा संध्याकाळी आजच्यासारखे 'रिअॅलिटी
शो' नसायचे.
त्याऐवजी आम्ही सगळी भावंडं देवासमोर उभं राहून 'शुभंकरोती'
म्हणायचो. आजच्यासारखं जास्तीत जास्त मार्क मिळवून
चांगलं शिक्षण घेण्याचं फॅड तेव्हा नव्हतं. मुलगा दर वर्षी पास होतोय ना मग झालं
असा विचार प्रत्येक आईबाबा करायचे. आईबाबांना तेव्हा मुलांना 'संगणकासमोरून उठ आणि बाहेर
जावून मातीत खेळ’ असं सांगावं लागायचं नाही. त्याऐवजी दिवेलागणी झाली की आईला
मुलांना हाका मारून घरात बोलवावं लागायचं.”
“हल्लीच्या
आयांसारखी तेव्हा मुलांच्या बाबांना एकेरी नावाने हाक मारण्याची प्रथा नव्हती.
प्रत्येक आई मुलांच्या
बाबांना 'अहो, ऐकलंत का?' असं म्हणुन हाक मारायची. 'समान हक्क' वगैरेंच्या घोषणा देवून
तेव्हा शिकलेल्या बायका घरावर सत्ता चालवत नसत. कितीही शिकल्या तरी तेव्हाच्या
बायका नवऱ्याचं घरातलं प्रमूखपण आनंदाने मान्य करत असत. संगणकाच्या पडद्यावर बुडबुड्यांचा
स्क्रिन सेव्हर चालू करण्याऐवजी तेव्हाची मुलं साबणाच्या पाण्यात सुकलेल्या वेलिपासून
तयार केलेली नळी बुडवून खरोखरीचे बुडबूडे हवेत सोडून त्यांचा पाठलाग करत असत. दोन
पुरुष एकमेकांचे खास मित्र किंवा दोन स्त्रिया एकमेकिंच्या जिवलग मैत्रिणी असल्या
तरी तेव्हा त्यांचा 'भलता' संषय घेतला जात नसे.”
“मुलांना
पोहता यावं म्हणुन पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पुलामधे तेव्हा हजारो रुपयांची
फी भरली जात नसे. त्याऐवजी मुलांच्या कमरेला सुकलेल्या नारळाच्या 'सुगड्या' बांधून त्यांना विहिरींत ढकललं
जायचं. शरीरस्वास्थ्याच्या नावाने चाललेला स्वच्छतेचा तेव्हा आतासारखा 'हैदोस' नव्हता. न्हाणीघराची फरशी दिवसभर
ओली राहिली तरी तेव्हा कोणाला त्याचं काहिही वाटत नसे. मुलं खेळताना मातीत लोळली
तरी तेव्हाच्या आया मुलांच्या प्रकृतीची काळजीही करत
नसत आणि कपडे धुवायाला किती त्रास होतो म्हणून
कुरकुरही करत नसत. आमच्या वेळी आतासारखे 'आर.
ओ.’ वॉटर
फिल्टर आणि बिसलेरी हे प्रकार नव्हते. प्रवास करणारी माणसं कोणत्याही नळाचं आणि
विहिरीचं पाणी अगदी बिनदिक्कत कुठल्याही भांड्यातून पीत असत. तहान लागली तर
पिण्याच्या पाण्यासाठी तेव्हा भारतात कुठेही कोणालाही हल्लीसारखे पेसे द्यावे लागत
नसत. तेव्हा 'बटाटा
वडा' आणि 'पाव' ह्या दोन्ही गोष्टी होत्या, पण 'वडापाव' नव्हता. तेव्हा काही खास
हॉटेलांतून सणाच्या दिवशी उपासाची खिचडी,
उपमा,
मिसळ हे पदार्थ मिळायचे. पण पिझ्झा,
बर्गर, केन्टकी
ही नावंही तेव्हा कोणी ऐकली नव्हती. आतासारखी तेव्हाची मुलं संगणकावर लढाईचा खेळ
खेळत नसत. त्याऐवजी झाडाच्या फांद्या,
पोपईचे दांडे,
तुटलेल्या काठ्या ह्यांच्यापासून बनवलेल्या लुटुपूटिच्या
तरवारी घेवून 'औरंगझेब' आणि 'शिवाजी महाराज' ह्यांच्यातली लढाई मुलं करत
असत. आत्तासारखे तेव्हा डीझाईनर कपडे नव्हते. दिवाळीला कपड्याच्या एकाच ताग्यातून सगळ्या
भावंडांना एकाच रंगाचे कपडे शिवले जायचे. बाबांना, आजोबांना तेव्हा कोणिही 'मित्र’ समजत नसत. त्याऐवजी
त्यांचा धाक असायचा आणि त्यांना देवासारखा मान दिला जायचा.”
“शी!
किती कुजकट विचारांची आणि मागासलेली होती हो तुमची पिढी आजोबा." नातू
म्हणाला.
“हो, खरं आहे तुझं म्हणणं. आम्ही
खरंच कुजकट विचारांचे असू, पण
आमच्यावेळी आत्ताच्यासारखे घटस्फोट,
दहशतवाद, निर्दोष
माणसांची हत्त्या वगैरे गोष्टीही नव्हत्या. त्यावेळी आत्महत्याही कमी व्हायच्या. तेव्हा
शारिरीक सुखं देणाऱ्या गोष्टी कमी होत्या आणि कष्ट जास्त होते पण तरिही लोकं जास्त
सुखी होती, जास्त
समजुतदार होती. दुसऱ्याचा विचार करणाऱ्याला तेव्हा 'मामू'
समजत नसत. तेव्हाही लाचलुचपत होती पण ती आत्ताएवढी
उघडपणे होत नसे. लाच घेणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही लाज वाटत असे आणि अशी 'देणिघेणी' गुपचुपपणे होत असत. त्या काळी
एखाद्या गुन्हेगाराबरोबर ओळख असेल तरी लोकं ती गोष्ट समाजापासून लपवून ठेवत असत.
हल्ली एखाद्या गुंडाशी ओळख असेल तर लोकं अभिमानाने सगळ्यांना सांगत सुटतात. आमच्या
वेळी मोठया भावाला वडिलांसारखा मान दिला जायचा. त्या काळी आत्तासारखं कोणी पैशासाठी
मोठया भावाला कोर्टात खेचत नसत. त्या काळी एखादी गोष्ट सांगताना वडीलधारी माणसं “मी सांगतो
म्हणून” असं म्हणत असत आणि घरातली इतर माणसं ते ऐकत असत.
हल्लीसारखं त्यावेळी वडिलधाऱ्यांना “पण
का?” असं
विचारण्याची तेव्हा फॅशन नव्हती.
“होती
तर! पण ती मोठी माणसं दाखवत नसत. त्यांच्या धाकात राहिल्यानेच आमची पिढी व्यसनांपासून, मानसिक आजारांपासून, गुन्हेगारीपासून शेकडो योजने
दूर होती. " आजोबा म्हणाले.
“आजोबा, तुमचं वय किती आहे हो?” नातवाने विचारलं.
“फक्त
५८ वर्ष बाळा." आजोबा म्हणाले.
*********************
पत्ता :
मिलिंद चौबळ.
खोली क्र. ५,
घर क्र. ८६,
मु. पो.
उंबरपाडा (सफाळे),
ता. व जिल्हा
: पालघर,
पिन : ४०११०२.
दूरध्वनी :
८८३०६९१७०९ (WhatsApp).
दूरध्वनी
(युरोप) : (+३५१) ९२०१४१५८०.
Yes , very good
ReplyDeleteसाहेब ....तुम्ही खरी परिस्थिती मांडली आहे.!
ReplyDeleteसाहेब ....तुम्ही खरी परिस्थिती मांडली आहे.!
ReplyDeleteये तो टाईम टाईम की बात है. जुने ते सोने असे मानून चालणार नाही...
ReplyDelete