Friday, February 22, 2019

(भूक)-भूतबंगला.

भूतबंगला.
आमच्या गावात एक झपाटलेलं घर होतं अशी माझ्या लहानपणापासून मी अफवा ऐकत होतो. म्हणजे ते एक मोठं, कोणीही राहत नसलेलं, जुन्या वाड्यासारखं घर होतं. त्याला तळमजला व आणखी वरती एक मजला होता. कोणीही राहत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी जमतील तेवढ्या वस्तू चोरून नेल्या होत्या. खिडक्यांच्या काचा फोडल्या होत्या. अंगणातल्या झाडांच्या कुंड्याही चोरून नेल्या होत्या. फुटलेल्या काचांतून पाहिलं तर आत अंधारात एक जिना दिसायचा. वीज बोर्डाने अनेक वर्षांपूर्वीच त्या घराचा विजेचा पुरवठा कापून टाकला होता. त्यामुळे बटणं, होल्डर्स, वायर्स यांचा कोणालाच काही उपयोग होण्यासारखा नसल्याने लोकांनी त्या वस्तूही उचकटून चोरून नेल्या होत्या. कधी त्या बाजूला गेलोच तर जवळ जायलाही भीती वाटायची. अगदी लहानपणापासूनच त्या वास्तूबद्दल एक गूढ मनात होतं. अनेकदा त्या घराबद्दल काही काही गोष्टी कानावर येत असत. लोकं म्हणत असत की रात्री त्या घरात कोणीतरी स्वयंपाक करतं कारण भांड्यांचा आवाज येतो. कोणी म्हणत असत की रात्री कोणीतरी बाई भेसूर आवाजात रडत असते. लहानपणी कानावर आलेलं सगळं खरंच वाटतं. एवढे लोक नेहमी बोलतात म्हणजे नक्कीच ते खरं असणार असंही वाटायचं. वय वाढत गेलं तसा भूतंखेतं, पिशाच्च यांवरचा विश्वासच उडत गेला आणि कळू लागलं की माणसाला वाघ, सिंह यासारखे जंगली प्राणी, सापासारखे विषारी प्राणी आणि भूतंखेतं यांसारख्या अज्ञात योनी यापेक्षा सगळ्यांत जास्त भीती कोणापासून असेल तर ती दुसऱ्या माणसापासूनच.
गद्धेपंचविशीत गेलो तेव्हापर्यंत स्मशानात अमावस्येच्या रात्री बारा वाजता जाऊन पैजही जिंकून आलो होतो. त्या वयात सगळ्यांना आपण कोणीतरी ‘ग्रेट’ आहोत हे सगळ्यांना कळावं असं वाटत असतं; तसं ते मलाही वाटत होतं. त्यामुळेच स्मशानात जाणं वगैरेसारखा गोष्टी हातून घडल्या होत्या. पण तरीही आपला ‘ग्रेटनेस’ अजून व्हावा तसा सिद्ध झालेला नाही असं वाटत होतं म्हणून एकदा सगळ्या मित्रांमध्ये नाक्यावर बसून वासुगिरी करताना पैज लागली की त्या भूतबंगल्यात जो कोणी रात्री जाऊन स्वयंपाक करण्याचे, रडण्याचे जे आवाज येतात त्याचं रहस्य उलगडून दाखवेल त्याला ५०० रुपये मिळतील. मी लगेच ती पैज स्विकारली. पण मी असंही म्हणालो की, कदाचित काही गोष्टी आपल्या ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेरच्या असतील तर मला कळणार नाहीत. तरीही मी करत असलेल्या धाडसाबद्दल पैसे मिळाले पाहिजेत. उदा. कदाचित मी आत गेल्यावर माझ्यासमोर स्वयंपाक  करण्याचे आवाज येतील पण काहीच दिसणार नाही, असं झाल्यास त्यातील ‘रहस्य’ कसं कळणार? त्यावर थोडी वादावादी होऊन अखेर सगळ्यांनी पैसे देण्याचं कबूल केलं, त्याबरोबर मनात चर्रर्र झालं. कारण मला वाटत होतं की, मी अशी अट घातल्यावर कोणीच कबूल होणार नाही. मग मी एक युक्ती केली. माझी पार्ट टाईम इंजिनिअररिंगची परीक्षा दोन महिन्यानंतर येत होती. मी नोकरी व कॉलेज दोन्ही एकदमच करत असल्याने अभ्यासाला फार थोडा वेळ मिळत असे. म्हणून मी दोन महिन्यानंतरच भूतबंगल्यात जाण्याबद्दल परवानगी मागितली. आधी सगळ्यांनी थोडी नाराजी दाखवली पण नंतर सगळे कबूल झाले. मला खरं तर आपण जे काही करत आहोत त्याबद्दल जास्त माहिती काढायची होती. भूतंखेतं खरोखरच अस्तित्वात आहेत का, असल्यास त्यांच्यापासून कसं संरक्षण करायचं हे सगळं ह्या दोन महिन्यात मला माहिती करून घ्यायचं होतं.
माझ्या पैजेबद्दल २-३ दिवसांनी घरात कळल्यावर घरच्यांनी आधी नस्त्या भानगडी कोणी करायला सांगितल्या आहेत म्हणून कानउघडणी केली. आईने सरळ त्या मुलांमध्ये मिसळायला बंदीच घातली आणि अभ्यासात जास्त वेळ घालवायला सांगितला. पण मी गोरेगावच्या ज्या कंपनीत नोकरी करत असे त्या कंपनीचे मालक श्री. सुनील भन्साळी हे देवमाणूसच असल्याने जेव्हा कधी काम नसे तेव्हा मला त्यानी ऑफिसातच अभ्यासाची परवानगी दिली होती. शिवाय ते स्वत:ही इलेक्ट्रीकल इंजिनिअरच असल्याने मला अनेक वेळा त्यानी अभ्यासात मदतही केली होती. त्यामुळेच नोकरी व कॉलेज करत असूनही मी प्रत्येक सेमिस्टरला पहिल्या वर्गात पास होऊ शकलो. त्यामुळे मी अभ्यास कमी करतो, नापास होतो वगैरे तक्रारी घरच्या लोकांना करता येत नव्हत्या.
मी भूतांबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. त्यासाठी अशिक्षित, सुशिक्षित अशा सगळ्या लोकांना भेटलो. अशिक्षित लोकांमध्ये मदत करायची, माहिती द्यायची सोडून रहस्य आणखीच वाढवून, ‘तुझ्यापेक्षा मी कसा ग्रेट आहे' हेच सिद्ध करण्याची स्पर्धा लागल्यासारखी वाटली. खरी माहिती कोणीच दिली नाही. प्रत्येकाने ‘तुला ते नाय कळनार बाबा, त्यासाठी आख्खा 'जल्म' वेचावा लागतो' असाच सूर लावला. प्रत्येकाने मूळ विषयाला सफाईने बगल देऊन 'मी अमक्या अमक्या ‘झाडाला' (माणसाला) कसा वेताळाच्या तावडीतून सोडवला, तमक्याच्या छाताडावर बसून त्याला बुकलून बेशुद्ध करून मग त्याच्या बायकोशी घाणेरडे चाळे करणाऱ्या झोटिंगाला कसा मी हाकलून दिला' ह्याच गोष्टी जास्त सांगितल्या. मी 'झोटिंग' म्हगजे काय असं विचारल्यावर मला माहिती मिळाली की स्त्रीसुखासाठी आसुसलेला माणूस जर लग्नाआधी मेला तर इच्छा अतुप्त राहिल्याने त्याचं भूत बनते व ते सुंदर स्रीच्या नवऱ्याला झपाटून त्याच्या शरीरात शिरून त्याच्या बायकोला भोगून स्त्रीसुख मिळवतं. काही झोटिंग तर सुंदर स्त्रियांनाही झपाटतात. हे कळल्याबरोबर मी म्हणालो, अरे यार मग आमच्या मित्रमंडळातले खूपच जण लग्नाआधी मेले तर झोटिंगच होतील. त्याला काही कळलंच नाही.
अशिक्षित लोकांकडून काहीच उपयोगी माहिती मिळाली नाही म्हणून मग मी आपला मोर्चा सुशिक्षित लोकांकडे वळवला. 'गूढरम्य' नावाने सुरुवात होणारं एक मासिक मुंबईहून प्रसिद्ध होत असे. त्याचे संपादक स्वत: बी. एस. सी. झालेले होते. त्यांना जाऊन भेटलो. त्यांचं 'मोहिनी विद्या’ या  विषयावर एक पुस्तकही प्रसिद्ध झालं होतं व ते पोस्टल ट्युशनने ती विद्या शिकवतही असत. मी स्वत:ही त्या विद्येचा अभ्यास करत असताना त्यांना अनेकदा जाऊन भेटलो होते व शंकानिरसन करून घेतलं होतं. त्यांनी सरळ भूतंखेतं यांच्या अस्तित्वावर विश्वास दाखवला मला एक इंग्रजी पुस्तकही दिलं. ते खूप जुनं पुस्तक होतं व त्यात ब्लॅक अॅन्ड व्हाइटमध्ये काढलेले भुतांचे अनेक फोटोही होते. एखाद्या शेकोटीतून निवणाऱ्या घुरासारखेच ते फोटो दिसत होते. मी ते पुस्तक वाचलं तेव्हा कळलं की अमेरिका, फ़ान्स यांसारख्या प्रगत देशातही अनेक उच्चशिक्षित लोकही या विषयावर संशोधन करत आहेत. तिथे आपल्यासारखं या विषयावर संशोधन करणाऱ्या लोकांना वाळीत टाकत नाहीत. आपल्याकडे कोणाकडे जरी या विषयावरचं एखादं पुस्तकही दिसलं तरी लोक म्हणतात की, तुझ्यासारख्या उच्चशिक्षित मागसाला या भानगडी कोणी करायला सांगितल्या आहेत. चांगल्या विषयांवरची पुस्तकं वाचायची सोडून हे काय भलतंच खूळ मनात घेतलं आहे? वगैरे वगैरे. मी स्वतः गोंदवलेकर महाराज चरित्र, ज्ञानेश्वरी यासारखी चांगली पुस्तकं वाचतानाही लोकं असंच म्हणत असत.
अनेक शिकलेल्या लोकांना भेटलो. काही लेख, कात्रणं आणि ते पुस्तक यातून थोडी माहिती मिळाली ती अशी : भूतं ज्या द्रव्यापासून बनलेली असतात ते द्रव्य कशाच्याही आरपार जाऊ शकतं. इंग्रजी पुस्तकात त्याला ‘इथर’ म्हटलं होतं. मेस्मेरिझम चा जनक डॉक्टर मेस्मेर यानेही या द्रव्याचा उल्लेख केला आहे. मेस्मेरचा आवडता शिष्य ‘मार्किस द पुसेगुर’ यानेही मेस्मेरच्या या सिद्धांताला पाठींबा दिला आहे. हे द्रव्य फक्त वेत व चांदी या दोनच वस्तूंच्या आरपार जाऊ शकत नाही. हे कळल्यावर मला आठवलं की अशिक्षित, करणी, जारण-मारण करणारे झपाटलेल्या व्यक्तिला मारण्यासाठी नेहमी वेताचीच छडी वापरत असत. म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असणार. पण त्यांची वृत्तीच जास्त खोलात जाऊन आभ्यास करण्याची नसल्याने त्यांना स्वत:लाच जिथे जास्त माहिती नव्हती तिथे ते मला काय शिकवणार? त्यांच्यातल्याच एकाला परत एकदा भेटून मी म्हणालो की, वेताच्या छडीऐवजी तू चांदीची छडी का वापरत नाहीस? त्याबरोबर तो उडालाच. मला बाजूला घेऊन म्हणाला, सायेब, तुम्ही मोठे मांत्रिक दिसत. ४० वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या गुरूने हेच सांगितलं होतं व ज्या कोणाला हे माहिती असेल तो फार मोठा मांत्रिक आहे असं समजावं असही तो म्हणाला होता. मी त्याला ते ‘विंग्रजी’ पुस्तकात वाचल्याचं व मी कोणीही मांत्रिक वगैरे नसल्याचं सांगितलं.
माहिती मिळाली. आता संरक्षणाची व्यवस्था करायला हवी. माझ्या एका बिल्डर मित्राकडे लायसन्स असलेलं पिस्तुल होतं. माझ्यावर त्याचा पराकोटीचा विश्वास असल्याने मी मागितल्यास त्याने ते मला दिलं असतं. मी जेव्हा त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तो हसला पण त्याला माझं कौतुक असल्याने त्याने कपाटाचा खण उघडून तिजोरीतून ‘बेरेटा’ कंपनीचं ‘पॉइंट ट्वेंटी फाइव्ह ऑटोमटिक’ पिस्तुल माझ्या हातात ठेवलं. ते पाहून मी त्याला म्हणालो, अरे यार, बेरेटा म्हणजे जेम्स बॉंड फेम ना? पण त्याला ते माहितीच नव्हतं. कारण त्याने बॉंडचे सिनेमे पाहिले होते पण फ्लेमिंगने लिहिलेल्या कादंबऱ्या वाचलेल्या नव्हत्या. त्याने मला ते कसं लोड करायचं, सेफ्टी कॅच कसा ओंन ऑफ करायचा, कसं साफ करायचं, त्याला तेलपाणी कसं करायचं वगैरे सगळं शिकवलं व १० गोळ्याही दिल्या. त्यातल्या ६ भरून ४ उरलेल्या एका डबीत मी भरून घेतल्या व त्याचा निरोप घेतला.
भरलेलं पिस्तुल खिच्यातून नेताना उगीचच आपण कोणीतरी ग्रेट झालो असं वाटू लागलं. अनेकदा कोणी आजूबाजूला नसताना मी ते लपवलेल्या जागेतून काढून उगीचच नेम धरत असे आणि गोळ्या मारल्याचा अविर्भाव करत असे. त्या सगळ्या गोळ्या लोखंडाच्या व आत शिसं असलेल्या होत्या. मला त्यांचा काहीच उपयोग होण्यासारखा नव्ह्ता. कारण त्या जर भी भूतांवर झाडल्या असत्या तर त्यांच्या अंगातून आरपार जाऊन हिंदी सिनेमात दाखवतात तशी ती भूतं माझ्यावर हसली असती. मला चांदीच्या गोळ्या हव्या होत्या. मग 'दोन' नंबरवाल्या एका मित्राकडे जाऊन गावठी पिस्तुलं व गोळ्या बनवणाऱ्या एकाला भेटलो त त्याला एक गोळी दाखवून याच मापाची पण चांदीची गोळी बनवून देशील का असं विचारलं. त्याच्याकडे येणारे सगळे गुन्हेगारच असत. पैसे घेऊन खुनांच्या सुपाऱ्या घेणारे. त्यामुळे कोणाकडेच जास्त चौकश्या करायच्या नाहीत हे त्याचं तत्त्व होतं. मलाही त्याने "चांदीच्या गोळ्या कशाला पाहिजेत' वगैरे न विचारता दोन दिवसांनी भेटायला सांगितलं.
दोन दिवसांनी गेलो तेव्हा त्याने सांगितलं की, गोळ्यांचं बाहेरचं कवच व आत वितळवून ओतलेलं शिसं अशा रितीने तो गोळ्या बनवतो. त्या कवचासाठी लागणाऱ्या लोखंडाच्या नळ्या तो त्याच्या एका मित्राकडून विकत घेतो. तो मित्र 'जमशेटपूर’ येथे टाटांच्या पोलाद बनणाऱ्या कारखान्यात काम करतो. वितळलेलं पोलाद वाहून नेण्यासाठी ज्या नळ्या वापरतात त्या फारच मजबूत पोलादाच्या असतात. साध्या नळ्या पिस्तुलाचं बॅरल किंवा गोळ्या बनवण्यासाठी वापरल्या तर स्फोट होताच त्या फुटून जातात म्हणून अशा खास नळ्याच वापराव्या लागतात. त्याच्याकडून मिळणाऱ्या नळ्यांचा व्यास माझ्या बेरेटाच्या गोळ्यांपेक्षा जास्त असल्याने अगदी बरोबर त्याच मापाच्या गोळ्या तो बनवू शकत नव्हता. त्यातही चांदीच्या गोळ्या बनवणं त्याला शक्‍यच नव्हतं. मला तर भूताला ‘उडवायला' चांदीच्याच गोळ्या पाहिजे होत्या. ते शक्‍य नव्हतं म्हणून मी हताश होऊन परत आलो. बराच विचार करून दोन दिवसांनी त्याला परत जाऊन भेटलो. त्याला म्हणालो की, थोड्या लहान आकाराच्या गोळ्या चालतील. त्याने बेरेटाची गोळी व त्याच्याकडच्या अनेक वेगवेगळे व्यास असलेल्या त्या 'खास' नळया व्हर्निअर कॅलिपरने मोजल्या व काम होऊ शकेल असं मला सांगितलं. मी खूश झालो व त्याला म्हणालो की, कवच त्या 'खास' पोलादी नळ्यांचंच बनव पण आत शिश्याच्या ऐवजी चांदी वितळवून ओत. त्याने होकार दिला. दोन दिवसांनी गेलो तेव्हा १० गोळ्या तयार होत्या. पण शिश्याऐवजी चांदी वितळवून ओतायला बराच खर्च आल्याचं त्याने सांगितलं व ठरलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे घेतले. मीही काही न बोलता त्याला पैसे दिले तेव्हा तो म्हणाला, मुझे मालूम नही आपने चांदी का गोली क्यो बनवाया. लेकीन बेरेटा में डालके ये गोली मत वापरो. एक तो बैरल से गोली का डायमीटर कम है करके गोलीके बाजूसे पूरा पावर बाहर निकल जाएगा और वो गोली बैरल से बाहर निकलते वखत बैरल के अंदर ही अंदर कॅरम के सोंगटी की माफिक रिबाउंड हो जाएगा और इतने महंगे इम्पोर्टेड गन के बैरल को अंदरसे डॅमेज करेगा और रिबाउंड होनेकी वजह से निशाना भी बराबर नही लगेगा. क्यो की गोली बैरल के सेंटर से नही निकलेगा. मला एकदम नवीनच ज्ञान मिळालं. गोळी बॅरल पेक्षा अगदी थोडीच कमी व्यासाची असावी. नाहीतरी ती नळीला आतून घासून निघते व त्यामुळे तिचा वेगही कमी होतो, नेम बरोबर लागत नाही व नळी खराब होते ती होतेच.
         मी त्याचे आभार मानून निघालो. आता माझ्या खिच्यात चांदीच्या गोळ्या असलेलं, माणूसच काय भूतालाही ‘उडवू’ शकणारं, परदेशी बनावटीचं, जेम्स बॉंड वापरत असलेलं पिस्तुल होतं व त्यांमुळे माझ्या अंगावर मुठभर मांस चढलं होतं. त्यावेळी जर माझ्या हातून एखादा खून वगैरे घडला असता तर पोलीस चांदीच्या गोळ्या पाहून चक्रावूनच गेले असते. मला आठवलं की जेम्स बॉंडच्या ‘मॅन विथ द गोल्डन गन’ या सिनेमांत खलनायक जेम्स बॉंड ला मारण्यासाठी जे सिगारेट केस, लायटर व पेन यांची जोडणी करून पिस्तुल बनवतो त्यामध्ये ००७ असा आकडा लिहिलेल्या सोन्याच्या गोळ्या असल्याचं दाखवलं होतं. कथा, कादंबऱ्या, सिनेमा यात ते ठीक होतं पण प्रत्यक्षात चांदीच्या गोळ्या वापरणारा जगात मी पहिलाच माणूस असेन.
         भुताला आव्हान देण्याआधी मी एखादं कवच तरी मंत्रून अंगावर घालावं असं अनेक अशिक्षित मात्रिकांचं मत पडलं पण मंत्रातंत्रावर माझा विश्वासच नसल्याने मी नकार दिला. आता मी रहस्यभेद करायला सिद्ध झालो होतो.
         दोन-तीन महिन्यांनी भूतबंगल्याबद्दल मी जेव्हा चौकशी केली तेव्हा रडण्याचे, स्वयंपाक करण्याचे नक्की असे वार ठरलेले नव्हते असं मला कळलं, तेव्हा मी विचार केला की भूतं बेशिस्तच दिसताहेत. मला अनेक दिवस तिथे जाऊन बसावं लागणार होतं. ते दिवसही उन्हाळ्याचे होते हे माझ्या पथ्यावरच पडलं. मी घराबाहेर अंगणात झोपायला सुरुवा केली. पैजेचे ५०० रुपये मध्यस्थाकडे येऊनही पडले होते. परीक्षाही होऊन गेली होती. सगळे मित्र मी कधी तेथे जाऊन बसतो याबद्दल उत्सुक होते. मला त्या इंग्रजी पुस्तकात अशीही माहिती मिळाली होती की ‘इन्फ्रारेड’ किरणांच्या कॅमेऱ्याने भूतांचे फोटो येऊ शकतात. पण त्या प्रकारच्या फोटोग्राफीबद्दल मला जास्त माहिती नसल्याने मी ३५ मिलीमीटरचा सिंगल लेन्स रिफ्लेक्स (एस. एल आर.) कॅमेराच बरोबर घेतला होता. त्याने भूतांचे फोटो येतील की नाही याबद्दल मी साशंकच होतो.
         ठरलेल्या दिवशी मी गादिखाली जीन्सची पँट व बॅटरी (टॉर्च) लपवून ठेवली व नेहमीप्रमाणेच रात्री बाहेरच्या अंगणात झोपलो. हातातल्या घड्याळात रात्री ११.३० चा गजर लावून ठेवला व झोपी  गेलो. गजर झाल्यावर उठलो व पॅन्ट घालून, खिश्यात बेरेटा (पिस्तुल) घेऊन बॅटरी बरोबर घेऊन निघालो. पहिल्या दिवशी माझ्याबरोबर चार जण आले. त्यांच्यापैकीच कोणीतरी मला घाबरवण्याची शक्यता होती म्हणून आत जाण्याआधी मी सगळ्यांना खिच्यातून पिस्तुल काढून दाखवलं व मी काहीही झाल्यास आधी गोळी मारणार व मगच रहस्यभेद करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पिस्तुल पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्यात चांदीच्या गोळ्या आहेत हे जर त्यांना कळलं असतं तर ते उडालेच असते.
         मी एका तावदान तुटलेल्या खिडकीतून आत प्रवेश केला. मी भूतबंगल्यात गेल्याची खात्री होताच मित्र परत गेले व लांब जाऊन आंधारात कोणाला दिसणार नाही असे उभे राहिले. मी मधेच बाहेर पडू नये व मदत लागल्यास ती मिळावी म्हणून ते ठरल्याप्रमाणे पहाटेपर्यंत तिथेच थांबणार होते. ते सगळे लांब गेल्यावर मला जाणवलं की आपल्या छातीतली धडधड वाढलेली आहे. छे, आपण ५०० रुपयांसाठी फारच मोठा धोका पत्करत आहोत, आपला विश्वास नसला तरी चालेल पण मंत्रवलेलं कवच अंगात घातलं पाहिजे होतं असं मला वाटू लागलं. मला अजूनही खात्री आहे की जर मी त्या वेळी त्या इंग्रजी पुस्तकात कवच वगैरे बद्दल वाचलं असतं तर माझा नक्कीच विश्वास बसला असता व मी कवच घातलंही असतं.
         सगळ्या घरात एक कुबट वास भरून राहिला होता. मी मनांतल्या मनात रामाचं नांव घेत जिना चढू लागलो. सात-आठ पायऱ्या चढल्यावर एक पायरी अचानक करकरली तेव्हा एकदम सगळे आवाज थांबल्यासारखे वाटलं. असं वाटलं की, आजूबाजूच्या सगळ्या वस्तू आपल्याच नादात गुंग होत्या. त्यांना पायरीचा आवाज ऐकायला आल्यामुळे त्या सगळ्या सावध झाल्या आहेत व ‘कानोसा’ घेत आहेत. मग निग्रहाने मी असले भीतीदायक विचार झटकून टाकले आणि वरच्या मजल्यावर गेलो. लोकांनी दाराच्या कड्याही चोरलेल्या असल्याने सगळी दारं जरी बंद असली तरी थोडा जोर करताच उघडली जात होती. सिनेमात पाहतो तसा ‘कर्रर्र....’ वगैरे आवाज न येताच पहिल्या खोलीचं दार उघडलं. आत काहीही नव्हतं. आत जाऊन बॅटरीच्या उजेडात पाहिलं तर खुंटीला एक घडीची आरामखुर्ची टांगलेली व कोपऱ्यात पडलेल्या तिच्या काठ्या दिसल्या. तेव्हा सुचलं की इथे एवढी धूळ साचलेली आहे की जमिनीवर बसताही येणार नाही. एखादी खुर्ची किवा स्टूल आधीच आणून ठेवायचं आपल्याला का सुचलं नाही? रात्रभर या एवढ्या मोठ्या घरात उभंच कसं रहायचं? ठीक आहे, थोड्या वेळाने हीच आरामखुर्ची जोडून तिच्या कडेवर बसू या असा विचार करून मी इतर खोल्या पहायला बाहेर पडलो.
         पहिल्या मजल्यावर फक्त तीन खोल्याच होत्या. शेवटच्या खोलीला माळा होता. ती बहुतेक स्वयंपाकाची खोली असणार. कारण माळ्याच्या खालीच जेवणाचा धक्का होता. माळ्याला मजबूत फळ्या खिळ्यांनी ठोकून दार बंद केलं होतं. उरलेल्या भागात सहा इंच फळी व सहा इंच मोकळी जागा होती. जेवणाच्या धक्क्यावर चढून माळ्यावर बॅटरीचा उजेड टाकल्यावर आत माणसंही बसू शकतील अशी चार-पाच भांडी दिसली. हल्ली तेवढी मोठी भांडी बघायलाही मिळत नाहीत. मी विचार केला की जर भूतं या भांडयांमध्ये स्वयंपाक करत असतील तर नक्कीच आजूबाजूच्या से-सव्वाशे भूतांनाही जेवायला बोलावत असतील. कारण त्या भांड्यांमध्ये तेवढ्या लोकांचं किंवा भूतांचं जेवण सहज झालं असतं. पण ती भांडी तर बऱ्याच वर्षात वापरल्यासारखी दिसत नव्हती. कारण त्यांच्यावर जवळ जवळ इंचभर तरी धूळ असेल. जेव्हा कधी भूतं स्वयंपाकाचा विचार करतील तेव्हा आपल्याला याच खोलीत यावं लागेल असा विचार करत मी खाली उतरलो.
         तळमजल्यावर हॉलच्या व्यतिरिक्त तीन आणखी खोल्या होत्या. मी सगळ्या खोल्या फिरून पाहिल्या. पण एखादं फडकं, तुटलेलं फळकुट याशिवाय कुठेच काहीच नव्हतं. शेवटची खोली स्वयंपाकघर असल्यासारखी वाटली व तिथे एक बाबा आदमच्या जमान्यातली केरसुणी पडलेली दिसली.
         प्रत्येक खोलीत शिरताना मी डाव्या हातात बॅटरी आणि उजव्या हातात ०.२५ (पिस्तुल) घेऊनच सावधपणे शिरत असे. प्रत्येक वेळी छातीतली धडधड एवढी वाढत असे की जवळ कोणी असतं तर त्याला नक्कीच धडधड ऐकू आली असती. दहा मिनिटांत सगळं घर पाहून झालं व आता काय करायचं हा मोठा प्रश्नच पडला. घड्याळात पाहिलं तर आता कुठे १२.१० होत होते. अजून या धुळीने भरलेल्या घरात निदान पाच तास तरी काढायचे होते. मग सरळ फेऱ्या मारायला सुरुवात केली. तळमजल्यावरचा मोठा हॉल, मग स्वयंपाकघर, तिथून परत हॉल, मग जिना, पहिल्या मजल्यावरच्या सगळ्या खोल्या फिरून मग तिथून परत खाली अशा चकरा सुरु केल्या. माझ्या पावलांच्या आवाजाशिवाय दुसरा कसलाही आवाज येत नव्हता. प्रत्येक वेळी जिना चढताना ती विशिष्ट पायरी करकरत होती. असे दोन तास गेले असं वाटलं म्हणून मी घड्याळात पाहिलं तर फक्त १२.५५ झाले होते. डुलक्या येऊ लागल्या. दारू प्यालेल्या माणसासारख्या झोकांड्या जाऊ लागल्या. सरळ जमिनीवर ताणून द्यावी म्हणून बॅटरीच्या उजेडात पाहिलं तर धूळ, जळमटं व उंदरांच्या लेंड्यांचा खच पडला होता. स्वयंपाकघरातून थोड्याच वेळापूर्वी पाहिलेला झाडू घेऊन आलो व हॉलमधली थोडी जागा साफ केली. धूळ एवढी उडाली की मला शिंकाच आल्या. जमिनीवर बसलो तेव्हा एकदम कुबट वास आला. एवढ्या घाणेरड्या जागी कसली कपाळाची झोप येणार? मग परत उठून फेऱ्या मारू लागलो.
आधी इथे आलो तेव्हा कसलाही आवाज येऊ नये असं वाटत होतं. पण आता कसलातरी आवाज यावा व काय एकदाचं व्हायचं ते होऊन जाऊ दे असं वाटू लागलं. पण काहीच झालं नाही. सबंध रात्र मी फेऱ्या मारत राहिलो व पहाटे ५ वाजता खिडकितून बाहेर येऊन मित्र उभे होते तिथे गेलो तर फक्त एकच जण शेतातल्या खाचरात बांधावर बसून डुलक्या घेत होता. त्याने सांगितलं की यापुढे इथे कोणीही थांबणार नाही. कारण लोकांना कळू नये म्हणून गप्पाही मारता येत नाहीत. कोणाला कळू नये अशी अट मीच धातली होती. कारण मी रात्री तिथे जातो हे मित्रांशिवाय कोणालाही कळलं असतं तर ते माझ्या घरीही कळलं असतं आणि मग मला घरच्या लोकांनी बाहेर जाऊ दिलं नसतं. घरचे कोणीही उठायच्या आत मी अंगणातल्या खाटेवर येऊन झोपी गेलो. सकाळी जवळजवळ १० वाजता उठलो तेव्हा आठवलं की खूप थकल्यामुळे रात्री आपण जीन्सची पँट तशीच अंगावर ठेऊन झोपी गेलो होतो. मग कोणाच्या लक्षात येण्याच्या आधीच पांघरुणातच पॅन्ट काढून पुन्हा गादीखाली लपवून ठेवली. त्या दिवशी ऑफिसला रजा असल्याने दुपारीही झोप घेऊ शकलो.
दुसऱ्या दिवशीही तिथे गेलो.  जाताना आराखुर्चीयं कापड घेऊनच गेलो होतो. एक मळकट फडकं व पाण्याची बाटलीही नेली होती. कॅमेरा, फ्लॅशगन, बॅटरी व पिस्तुल  या सगळ्या गोष्टी माझ्या दोन्ही हातांनी वापरणं शक्यच नसल्याने त्या दिवसापासून पुढे कधीही मी कॅमेरा व प्लॅशगन बरोबर नेली नाही. कारण मला भूतांना 'उडवायचं' होतं; त्यांना 'स्माईल प्लीज' म्हणून त्यांचे फोटो काढायचे नव्हते. त्या दिवशी माझ्याबरोबर येण्याचा कोणाचाच मूड नव्हता. कारण काहीतरी सनसनाटी घडेल असं माझ्याप्रमाणे त्यांनाही आता वाटत नव्हतं. पण तरीही ५०० रुपये दिले होते म्हणून दोघे  जण माझ्याबरोबर आले. मी आत गेलो. आज जराही भीती वाटत नव्हती. सरळ आरामखुर्ची खुंटीवरून काढून सगळ्या बाजूंनी नीट पुसून तिला कापड लावलं आणि त्यावर बसताच ती एवढी डाव्या बाजूला कलली की आत बसणाऱ्या माणसाला डाव्या कुशीवर झोपल्यासारखंच वाटेल. तरीही मी त्यावर बसलो व सरळ ताणून दिली. डाव्या हातात बँटरी घेवून तो हात मांडीवर ठेवून डोळे मिटले. पटकन झोप लागली.
सकाळी उठलो तेव्हा जाणवलं की एकाच बाजूला झुकलेल्या अवस्थेत झोपल्याने उजव्या कुशीत खूपच दुखत आहे. दिवसा आत येऊन आरामखुर्चीचं कापड कोणी चोरू नये म्हणून ते सोडवून खुर्ची परत खुंटीवर टांगून, पाण्याची बाटली घेऊन बाहेर आलो. बाहेर आलो तेव्हा माझी वाट पाहत फक्त एकच जण थांबला होता. मला पाहताच त्याने एकदम हसायला सुरुवात केली व म्हणाला की काल रात्री मी आत गेल्यावर जवळच राहणार एक माणूस भेटला होता व तो सांगत होता की गेले दोन दिवस भूतबंगल्यातून रात्री उजेडही दिसतो व कोणीतरी सारखं खालून वर व वरून खाली अशा बऱ्याच फेऱ्या मारत असतं कारण जिन्याच्या पायरीचा आवाज बाहेरही स्पष्ट ऐकू येतो. पुन्हा 'प्रकार' सुरू झाले. आता सगळ्यांनी मिळून ‘शांती’ वगैरेच करायला हवी' वगैरे वगैरे. हे ऐकताच मलाही हसू आल. असं वाटलं की आपण उद्या मोठमोठ्यांनी आजुबाजूला राहणाऱ्या लोकांना हाका मारायच्या म्हणजे मजाच येईल.
असे पाच दिवस गेले. नंतर नंतर तिथे रोज जाण्याचा मला व माझ्या मित्रांनाही कंटाळा येऊ लागला त्यामुळे मला फक्त सोडायला माझे मित्र येत असत व मी आत गेलो हे पाहून परत जात असत. खरं तर एवढ्या दिवसांत काहीच न झाल्याने माझाही मूड गेला होता. आणखी दोन-तीन दिवस येऊ आणि मग ५०० रुपये घेऊन सरळ इथे काहीही रहस्य नाही असं जाहीर करू असा विचार मी करू लागलो. पण सहाव्या दिवशी एक घटना घडली.
मी नेहमीप्रमाणेच आरामखुर्चीवर झोपलो होतो. नेहमीप्रमाणेच डाव्या हातात बॅटरी होती व तो हात मांडीवर ठेवला होता व भागच्या खिश्यात बेरेटा होतं. रात्री अचानक कोणीतरी अलगद आधी माझ्या ढोपरांना मग कमरेला व मग छातीला स्पर्श केला असं मला जाणवलं. मी दचकून ताडकन उठलो त्याबरोबर हातातली बॅटरी खाली पडली. माझ्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळीही बाहेर पडली. आरामखुर्ची धाडकन डाव्या बाजूला खाली पडली. मोठा आवाज झाला. काहीच दिसेना. मी पट्कन मागच्या खिश्यातून बेरेटा बाहेर काढलं आणि आजूबाजूला ते भयंकर शस्त्रं फिरवून दोन-तीनदा ट्रिगरही दाबला पण सेफ्टी कॅचमुळे गोळ्या उडाल्याच नाहीत. शिव्या देतच कोण आहे रे भेंचो...... असं बोललो. माझ मलाच जाणवलं की आपण फारच मोठ्याने बोललो. त्याचवेळी ची ची असा आवाज आला आणि माझं मलाच हसू आलं. मी शांत झोपलेला पाहून माझ्या अंगावर उंदीर चढला होता व मी त्याला घाबरलो होतो. मी अंधारात चाचपून बॅटरी शोधली व तिच्या उजेडात पाहिलं तर धुळीत उंदराची छोटी छोटी पावले उमटलेली दिसली. छातीर भयंकरच घडधडत होतं. घशाला कोरड पडली होती. अर्धी बाटली पाणी प्यालो तेव्हा बरं वाटलं. त्यानंतर मला रात्रभर झोप लागलीच नाही. पहाटे पहाटे पुन्हा डोळा लागणार एवढ्यात पहिल्या मजल्यावरून अस्पष्टपणे धातूवर धातू घासल्याचा आवाज आला आणि पुन्हा छातीत धडघडू लागलं. मी नीट कानोसा घेतला तर थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज आला. मी बेरेटा बाहेर काढून हातात घेतलं व बॅटरीच्या उजेडात जिना चढून गेलो. जाताना मुद्दामच ती करकरणारी पायरी टाळून गेलो जेणेकरून 'आवाज करणारे' सावध होऊ नयेत. पहिल्या मजल्यावर गेलो व थांबून पुन्हा कानोसा घेऊ लागलो. चार-पाच मिनिटांनी कंटाळून उतरणार एवढ्यात पुन्हा भांड्यांचा आवाज आला. तो आवाज त्या स्वयंपाकाच्या खोलीतूनच येत होता. जणू काही कोणीतरी गुपचूप स्वयंपाक करीत होतं. आवाज ऐकताच मानेवरचे केस एकदम ताठ झाले व कोणीतरी आपल्या मागेच उभं आहे असं वाटल. मागे वळून मी गोळ्या झाडणार एवढ्यात 'खण्ण' असा मोठा आणि स्पष्ट आवाज झाला.
मी सरळ धुम ठोकली व जिना उतरून खाली आलो व चुकून दाराच्या दिशेने जाऊन जोरात दार उघडण्याचा प्रयत्न करू लागलो. मग आठवलं की दार फळ्या ठोकून बंद केल्यामुळे आपण खिडकीतून आत आलो होतो. मी दाराला पाठ टेकवून जोरजोरात होणारा श्वास नियमित करण्याचा प्रयत्न करू लागलो. कारण पाच वाजत आले होते. त्या अवस्थेत बाहेर गेलो असतो तर सगळे हसले असते. २-३ मिनीटांत धाप जरा कमी झाल्यावर खिडकीतून बाहेर पडलो व मित्राला भेटलो. तो मला पाहताच, काय रे, तुला खरोखरच भूत तर दिसलं नाही ना? केवढा घाबरलेला दिसतोस. असं म्हणाला. रोज रात्री परत जाणारा तो आजच कसा पहाटेपर्यंत थांबला असं मी त्याला विचारल्यावर त्याने सांगितलं की तो रात्री घरी गेला होता व आत्ताच थोड्या वेळापूर्वी परत आला होता. मी काहीच झालं नाही व मी घाबरलेलोही नाही असं दाखवलं पण त्याला ते पटलं नसणार. कारण माझं घर जवळ आल्यावर त्याने विचारलं की काहीच झालं नाही तर पळून का आलास? जर नेहमीप्रमाणे आलास तर आरामखुर्चीचे कापड व पाण्याची बाटली कुठे आहे? मग त्याला नाइलाजाने माझा अनुभव सांगून 'नक्की तिथे काहीतरी आहे यार' असं मी म्हणालो. त्याने गंभीरपणे विचारल्यावर त्याला सगळा अनुभव सांगितला व आज मीही भांड्याचे आवाज ऐकले असं त्याला म्हणालो. पुढे असंही (खोटं) बोललो की आवाज रात्री दोन वाजताच आले होते व मी जाऊन पाहूनही आलो होतो पण काहीच दिसलं नाही. नंतर रात्रभर अज्ञाताच्या भीतीने झोपही लागली नाही. पहाटे पहाटे अगदी आत्ताच थोड्या वेळापूर्वी जरा झोप लागत नाही तेवढ्यात अंगावर उंदराने उडी मारली आणि घाबरलो. हे मात्र त्याला पटलं.
दुसऱ्या दिवशी ऑफिसात खूपच डुलक्या येत होत्या. संध्याकाळी कॉलेजला न जाता पुन्हा एकदा त्या बी. एस.सी. झालेल्या व गूढ विषयांना वाहिलेल्या मासिकाच्या संपादकांना भेटलो व सगळा अनुभव सांगितला. त्यावर त्यांनी सांगितलं की फक्त काहीही पाहायची माणसाची तयारी असेल तर कोणीच काहीच करू शकत नाही. कारण 'इथर' कशातूनही आरपार जात असल्याने त्यापासून बनलेली वस्तूही कशालाच स्पर्श करू शकणार नाही. त्यामुळे भूतांपासून शारीरिक इजा होण्याची शक्यताच नाही. फार तर भीतीदायक किंवा महाप्रचंड आकार धारण करून माणसाला घाबरवण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही परिस्थितीत शारीरिक इजा होणार नाही याची खात्री बाळगा. हे ऐकताच मी निश्चिंत झालो. फक्त भीतीदायक दृश्यच दिसणार असतील तर मग कशाला कोणाला घाबरायला हवं?
पुढले तीन दिवस काहीही घडलं नाही. मी रोज रात्री त्या माळ्यावर जात असे व भूतांना बोलत असे की तुम्ही फार फार तर काय करूं शकता तर मला भीतीदायक आकार दाखवून घाबरवू शकता. अरे तुम्ही माझ्यासमोर 'किस खेत को मूली' आहात. दीडदमडीची भिकारचो- भूतं तुम्ही. या कराटे शिकलेल्या तरण्याबांड माणसाला तुमचा बापही काही करू शकणार नाही. मला शारीरिक इजा करणंही तुमच्या बापाला जमणार नाही. पण मी तुम्हाला शारीरिक इजा करू शकतो. कारण माझ्याकडे चांदीच्या गोळ्या असलेलं पिस्तुल आहे. तेव्हा तुम्हीच माझ्यापासून सावध राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा की मी माणूस आहे. या विश्वातला सगळयात बुद्धिमान प्राणी, ज्याने आपल्या बुद्धीच्या जोगवर निसर्गाने मजबूत शरीर न देऊनही सर्व जगावर राज्य केलं. त्याच्या प्रतिनिधीला तुमच्यासारखे फालतू साधं लेचंपेचं का होईना पण शरिरही नसलेले इथरचे ओबडधोबड गोळे काय करू शकणार? वगैरे वगैरे, मी सतत बडबडत असे व बिनधास्तपणे घरभर फिरत असे. पुढे भुढे मलाच त्याची मजा वाटू लागली. एखाद्या कोपऱ्यातील कोळ्याचं जाळं वाऱ्याने हललं की मी म्हणत असे, आर यार भूता, कशाला कोपऱ्यात लपलास? चल बाहेर ये. आपण गप्पा मारू. तुला आवडतील अशा बऱ्याच  गोष्टींचा 'स्टॉक' माझ्याजवळ आहे. तू जर झोटींग असशील तर गावातल्या चालू पोरींचीही मी तुला माहिती देऊ शकेन. वगैरे वगैरे, अशा बऱ्याच वल्गना मी केल्या पण जेव्हा खरोखरच 'वेळ' आली तेव्हा मात्र भीतीने माझ्या हातापायातलं त्राणच गेलं होतं.
त्याचं असं झालं. अकाराव्या दिवशी मी नेहमीप्रमाणे आत जाऊन झोपलो असताना रात्री तीनला जाग आली तेव्हा जाणवलं कीआपल्या छातीत खुप धडघडतं आहे व मानेवरचे केस ताठ उभे राहिले आहेत आणि सगळ्या अंगाला दरदरून घाम सुटलेला आहे. माळ्यावरून अगदी स्पष्टपणे व मोठ्याने भांड्यांचा व कोणीतरी रडल्यासारखा व 'हूSSS... हूषSSS... असा आवाज येत होता. तो ऐकताच नेहमी भूतांना आव्हान देणारा मी, पण माझी वाचाच गेली. मी जोराने कोण आहे तिकडे असं म्हणण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाजच निघेना. त्या संपादकाने सांगितलेलं आठवत असूनही वर जाऊन पाहायची मनाची तयारीच होत नव्हती. शेवटी निर्धार करून उठलो, उजव्या हातात बेरेटा व डाव्या हातात बॅटरी घेऊन जिना चढू लागलो. सात-आठ पायऱ्या चढून परत खाली आलो. तेव्हा जाणवलं की आपले पाय थरथरत आहेत आणि गळा गरम झाला आहे. द्विधेत पडलो. कारण आवाज एवढ्या मोठ्याने येत होता की नक्कीच बाहेरच्या लोकांनाही ऐकू जात असणार. मी रोज रात्री
आत जाऊन झोपतो याची कुणकूण लोकांच्या कानावर गेलीच होती. त्यातही बाजूच्या शेतात जर माझा मित्र थांबला असेल तर तोही ऐकेल व जवळ येऊन उभा राहील. अशा वेळी जर कोणी त्याला विचारलंच तर तो नक्कीच सांगेल की आत मिलिंद गेला आहे म्हणून. कदाचित्त आजुबाजूचंही कोणीतरी कसला आवाज येतो आहे हे पाहायला येण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी जर मी पळून गेलो तर गावात तोंडही दाखवायला मला जागा राहणार नाही. च्यायला कुठे झक मारली आणि ही पैज स्वीकारली असं मला झालं. त्या क्षणी मला कळलं की मला खात्री होती की भूताखेतांचे प्रकार होतच नाहीत व त्यामुळे आपल्याला कसलीच भीती नाही. म्हणूनच मी ती पैज स्वीकारली होती. मी किती सहजपणे विचार केला होता की भूत दिसलं तर त्याला चांदीची गोळी मारायची. पण तेव्हा हा विचार मनात नव्हता की भूत दिसलंच तर भरलेलं पिस्तुल त्याच्यावर रोखण्याची तरी आपली हिंमत होईल का? मी स्वत:ला त्या क्षणापर्यंत अगदी निर्भय, धाडसी वगेरे समजत होतो. पण त्या क्षणी कळलं की आपण काहीही निर्भय, धाडसी, असामान्य वगैरे नाही. असामान्य बनण्याचा आपला एवड्या दिवसांचा प्रयत्न फसला व आपण साला सर्वसामान्यच राहिलो. आजवरच्या आयुष्यात आपण पत्करलेले धोके म्हणजे "कॅलक्युलेटेड रिस्क. होत्या, सगळ्या बाजूंनी विचार करून काही धोका नाही याची खात्री होताच पाऊल पुढे टाकलं होतं. पण हे जे काही समोर घडत होतं ते खरं होतं. संगणकावर युद्धाचे खेळ खेळणं आणि खरोखर सीमेवर जाऊन युद्ध करणं एवढा मोठा फरक दोन्हींमध्ये होता. त्याक्षणी जर कोणी थट्टेतही मला मागून स्पर्श केला असता तरी भीतीने मला हार्ट अटॅकच आला असता किंवा स्पर्श करणारा चांदीच्या गोळ्या खाऊन मेला असता.
         खड्यात गेले ते ५०० रुपये आणि बेअब्रू झाली तरी चालेल, जीव तर वाचेल. लोकंही काही दिवसांनी विसरून जातील. 'जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे खरंच आहे. असा विचार करून मी सरळ खिडकीतून बाहेर आलो. मला धक्काच बसला कारण समोरच माझा मित्र उभा होता. त्याची माझ्याकडे पाठ होती व तो कोणाशी तरी बोलत होता. तो ज्याच्याशी बोलत होता तो माणूस जवळच्याच घरातून उघड्या खिडकीतून त्याच्याशी बोलत होता. त्याला व त्या जवळच्या घरातल्या माणसाला इतक्या जवळ पाहून मला एकदम धीर आला. माझी चाहूल लागून मित्र वळला व मला पाहून मी बाहेर का आलो म्हणून त्याने विचारलं. क्षणार्धात मला उत्तर सुचलं. मी म्हणालो, अरे यार, तिथे काहीतरी आहे पण माझ्या बॅटरीतले रिचार्जेबल  सेल अगदी संपत आले आहेत. मला अंधारात काहीच दिसत नाही, तरीही मी गेलो होतो, अंधारात नेमही धरला होता पण हे सालं पिस्तुल जॅम झालं आहे. असं वाटतंय. त्याने कदाचित नंतर सगळ्यांना असंही सांगितले असतं की, 'मिलिंद घाबरून बाहेर आला होता व कसलीतरी फालतू कारणं सांगत होता म्हणून मीच त्याच्याबरोबर आत गेलो आणि तिथे नक्की काय आहे त्याचा शोध लावला. म्हणून मी त्याला म्हणालो, मी काही घाबरून बाहेर आलेलो नाही. मला तुझ्याकडची पॉवरफूल बॅटरी दे, मी एकटाच आत जातो. तू बाहेरच थांब. मी हाक   मारली तरच आत ये. असं म्हणून तो नको म्हणत असतानाही मी एकटाच आत गेलो. एवढ्या जवळ मित्र असताना, जवळच्याच घरातली माणसंही जागी असताना, हातात भरलेलं पिस्तुल असताना मला जराही भीती वाटत नव्हती.
मी आत गेलो तेव्हाही भांड्यांचे आवाज येतच होते. स्पष्टपणे एका मोठ्या भांड्यात चमच्याने ढवळल्याचे आवाज येत होता आणि रडण्यासारखेहीं आवाज येतच होते. मी शिव्या देतच जिना चढून गेलो. त्या खोलीसमोर जाऊन मी धाडकन दरवाजा उघडला व सरळ जेवण करण्याच्या धक्क्यावर चढून माळ्यावर आत्ताच मित्राकडून घेतलेली बॅटरी मारणार एवढ्यात एकदम तीन हिरव्या रंगांच्या डोळ्यांच्या जोड्या अंधारात चमकल्या. मी विचार केला की आता जर बॅटरी मारली तर भूतं सावध होऊन पळून जातील किंवा नाहीशी होतील म्हणून आधी नेम धरावा आणि गोळी मारण्याच्या अर्धा सेकंद आधी बॅटरी मारावी व लगेच ट्रिगर ओढावा.
त्य़ा हिरव्या डोळ्यांच्या तीनही जोड्या हलत होत्या. उघडमीट होत होत्या. भांडीही वाजतच होती. मो बेरेटा काढलं आणि त्यातल्या त्यात स्थिर असलेल्या डोळ्यांच्या जोडीच्या बरोबर मध्यावर नेम धरला. हात स्थिर राहावा म्हणून श्वास बंद केला आणि हृदयाच्या ठोक्याकडे लक्ष देऊ लागलो कारण दोन ठोक्यांच्या मधल्या काळात मला गोळी झाडायची होती, ज्या वेळी आपला हात सगळ्यांत जास्त स्थिर असतो. तेव्हा जाणवलं की आपलं हृदय इतक्या जोराने धडधडते आहे की दोन ठोक्‍्यांच्या मध्ये जराही वेळच राहत नाही. मग आधारासाठी आडव्या फळीवर हात टेकवला आणि डाव्या हातातली बॅटरी ज्या क्षणी पेटवली त्याच क्षणी बेरेटाचा ट्रिगर दाबला. उजेड पडताच मला दिसलं की तीन रानमांजरी त्या प्रचंड मोठ्या भांड्यांच्या काठावर फिरत आहेत. त्या आपल्या नेहमीच्या मांजरीपेक्षा मोठ्या होत्या व त्यांच्या शेपट्या गोंडेदार होत्या. त्यांचा रंग तपकिरी काळपट होता व आता माझ्याकडे पाहून जराही न घाबरता त्या फिसकारत आणि दात विचकत होत्या. मोठमोठ्याने ओरडून चाललेल्या त्यांच्या रानटी शृंगारात मी व्यत्यय आणल्याने त्या माझ्या  नरडीचा घोटच घ्यायला तयार होत्या. मी ट्रीगर दाबूनही गोळी उडालीच नव्हती कारण धावपळीत मी सेफ्टी कॅच उघडलाच नव्हता. मी पटकन जेवणाच्या धक्‍्क्यावरून खाली उतरलो तेव्हा जणू काही १० मैल धावत आल्यासारखी मला धाप लागली होती. डोक्यात घणाचे घाव पडत होते. बाहेर पडलो आणि जिना उतरू लागलो तेव्हा खिडकीतून मित्र व बाजूच्या घरातला तो माणूस येताना दिसला. अर्ध्या जिन्यात त्यांना गाठून म्हणालो,
अरे यार, इथे भूतंबितं काहीही स्वयंपाक करत नाहीत की रडत नाहीत. ओसाड घर बघून जवळच्याच जंगलातल्या बाहुल मांजरी वर ठेवलेल्या त्या भांड्यांच्या आत शृंगार करत आहेत. सगळे साले एवढी वर्ष उगीचच घाबरत होते. त्या दोघांनाही वर नेऊन सगळा प्रकार दाखवला तेव्हा त्यांनाही हसूच आलं. गेले दहा बारा दिवस जिन्यावर पावलांचे आवाज येत होते आणि जो उजेड दिसत होता ते भूत म्हणजे मीच होतो असंही त्या जवळंच राहणाऱ्या माणसाला आम्ही सांगितलं. नंतर आम्ही बाहेर पडलो.
दुसऱ्याच दिवशी मला पैजैचे ५०० रुपये मिळाले. मी ते पिस्तुल त्यातल्या चांदीच्या गोळ्यांसहीत मित्राला परत केलं. त्या संपादकांना भेटून सगळा प्रकार सांगितला. भूतं या विषयाची माहिती काढण्यासाठी मी घेतलेली मेहनत, त्यांना 'उडवण्यासाठी' गावठी पिस्तुल बनवणाऱ्याकडून खास बनवून घेतलेल्या चांदीच्या गोळ्या, मित्राकडून मिळवलेलं पिस्तुल आणि शेवटी रहस्यभेद होताच सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळाली हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी तो सगळा प्रकार लिहून प्रसिद्धीला पाठवायला सांगितला. लिहिण्याचा प्रयत्न केला पण नंत्तर साधी एक ओळही मध्ये टाकाविशी वाटली तरी सगळं पान पुन्हा लिहावं लागत असे म्हणून कंटाळून तो प्रयल सोडूनच दिला. 'लिहिणं वाटतं तितकं सोप्पं नाही महाराजा' हे पटलं.
जेव्हा त्या बंगल्यात घाबरण्यासारखं काहीही नाही हे सगळ्यांना कळलं तेव्हा सुरुवातीला रिकामटेकड्या लोकांचा तो बंगला म्हणजे गप्पा मारण्याचा अड्डाच बनला. तोपर्यंत सगळं ठीक होतं पण पुढे पुढे गावातल्या चालू पोरींना घेऊन जाण्यासाठी, चोरीचा माल लपवण्यासाठी, त्या मालाचं वाटप करण्यासाठी, तडीपार लोकांना लपवण्यासाठी, कसले कसले भयंकर प्लॅन्स करण्यासाठी जेव्हा त्याचा सर्रास वापर होऊ लागला तेव्हा मात्र वाईट वाटलं. आपण त्या वेळी आपला 'ग्रेटनेस' सिद्ध करण्यासाठी रहस्यभेद करायला नको होता असं अजूनही वाटत आहे.
*********************
पत्ता : मिलिंद चौबळ.
खोली क्र. ५, घर क्र. ८६,
मु. पो. उंबरपाडा (सफाळे),
ता. व जिल्हा : पालघर,
पिन : ४०११०२.

दूरध्वनी : ८८३०६९१७०९ (WhatsApp).
दूरध्वनी (युरोप) : (+३५१) ९२०१४१५८०.














No comments:

Post a Comment