Friday, February 22, 2019

लंगर.


लंगर
१ ऑक्टोबर २०१८ रोजी मी युरोपला आलो. पहिले काही दिवस Freelance Researcher म्हणून चांगली कामं मिळाली आणि नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल असे जवळ जवळ असलेले देश फिरून मी ती कामं पूर्ण केली. पण नंतर इथला शेतीचा मोसम संपला तेव्हा सगळ्याच व्यवसायांना उतरती कळा आली. इथली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे आणि नोव्हेंबर मध्ये हिवाळा सुरु झाल्यामुळे आता कुठल्याही शेतीत ऑलिव्ह, रासबेरी, स्ट्रॅाबेरी वगैरे पिकं पुढल्या वर्षाच्या फेब्रुवारी पर्यंत लागणार नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे येथे ४-५ महिन्यांची बेरोजगारी सुरु झाली. सगळेच व्यवसाय मंदावले. त्यामुळे मलाही कामं मिळेनाशी झाली.
मी काही दिवस पोर्तुगाल मधल्या लिस्बन या राजधानीच्या शहरापासून शेकडो मैल लांब असलेल्या ‘मीरा’ नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या ‘ओडीमिरा’ जिल्ह्यातल्या ‘विला नोवा दी मिल्फोन्तेस’ नावाच्या गावात राहत होतो. तिथे असलेली सगळी खानपानगृह (म्हणजे रेस्टॉरंट’) बंद पडली. मलाही त्या जागेचं भाडं एकट्याला भरणं महाग व्हायला लागलं आणि शिवाय त्या लहान गावात कामं मिळणंही शक्य नव्हतं म्हणून मी ती जागा सोडून लिस्बन शहरातील एका गरिबांच्या हॉस्टेलमध्ये रहायला आलो. इथे मला एका दिवसाचं ७ युरो एवढं भाडं द्यावं लागणार होतं. तिथे सामान ठेवायला कपाट नव्हतं. तिथे माझी ओळख एका गुजराथी आणि एका मराठी मुलाशी झाली. त्यांना दुसऱ्याच दिवशी काही कागदपत्रं बनवण्यासाठी ‘ब्रागा’ नावाच्या शहरात जायचं होतं. मी दिवसभर तिथेच राहणार असल्यामुळे मी त्यांच्या सामानावर लक्ष ठेवण्याचं कबूल केलं. मुलं गेली तेव्हा मी आणि त्यांनी हॉस्टेलच्या किचनमध्ये पावावर मायोनेस नावाचा दह्यासारखा पदार्थ टाकून खाल्ला. नंतर मुलं निघून गेली. जाताना मला त्यांनी ती मायोनेसची बाटली आणि पावाचा पुडा देवून ठेवला. माझ्या बाजूच्याच खाटेवर ३ मद्रासी मुलं होती. त्यांना रोज पाव खावून कंटाळा आला म्हणून त्यांनी अन्नं शिजवायची परवानगी नसतानाही स्वयंपाकघरात गुपचूप भात शिजवला. त्यासाठी त्यांनी ‘राईस कुकर’ही विकत आणला आणि ते जेवायला बसले. त्यांच्या बाजूलाच एक युरोपिअन मुलगी सिगारेट फुंकत, दारूचे घोट घेत बसली होती. बाजूची लोकं अधूनमधून येवून मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये खाद्यपदार्थ गरम करून खात होते. कोणीतरी हॉस्टेलच्या मालकाला मद्रासी लोकांनी भात शिजवल्याचं सांगितलं. त्याने येवून मद्रासी लोकांचं सामान बाहेर फेकायची तयारी सुरु केली. मला आश्चर्यच वाटलं. तिथे एक मुलगी दारू पीत, धुम्रपान करत बसली होती आणि तिला तो काहीही म्हणत नव्हता. पण फक्त भात शिजवला म्हणून मद्रासी लोकांना तो बाहेर काढत होता. मला युरोपिअन लोकांची गम्मतच वाटली. दारू प्यायला आणि धुम्रपान करायला परवानगी पण भात शिजवायला नाही. मालकाचं म्हणणं होतं की ती मुलगी काही ‘शिजवत’ नव्हती म्हणजेच ती नियम तोडत नव्हती. दारू पिणं आणि धुम्रपान करणं ही गोष्ट इथे चहा पिण्याएवढी सहजतेने करतात. कारण थंडी फारच असते.
शेवटी दादाबाबा करून त्याला मद्रासी म्हणाले की आता केला आहे तेवढा खातो आणि पुन्हा शिजवणार नाही. तेव्हा तो वरमला. मी हे पाहून दुपारच्या जेवणाच्या वेळेला पावावर मायोनेस लावून खाल्लं आणि पुन्हा खाटेवर येवून पडलो. मी क्षणभर हे विसरलो की इथे सकाळी ९ ते रात्री ९ च्या दरम्यानच फक्त उपहारगृहे उघडी असतात. मी माझ्या नवीन मित्रांना  फोन करून घडलेला प्रसंग सांगितला आणि त्यांना म्हटलं की मी जेवायला बाहेर जावू शकत नसल्याने फक्त पाव आणि मायोनेस खाल्लं आहे पण संध्याकाळी मला पोटभर जेवण पाहिजे. मी तर इथून निघू शकत नाही म्हणून तुम्हीच येताना माझ्यासाठी काहीतरी खायला घेवून या. मुलांनी होकार दिला. पण दुर्दैवाने मुलं इथे १० वाजता उतरली तेव्हा सगळी उपहारगृहं बंद झाली होती. म्हणून इतर दुकानातून काही फळं मिळतात का ते पाहण्यासाठी मुलं ११ वाजेपर्यंत फिरली पण दुकानंही बंद झाली होती. म्हणून ती मुलं मला फोन करून ‘दुसरीकडे काही खायला मिळतं का ते पाहतो’ असं म्हणून आणखी तासभर फिरली आणि रात्री १२ वाजता रिकाम्या हाताने परत आली. मी पुन्हा पावावर मायोनेस लावून ‘जेवलो’ तेव्हा मला आपली मुंबई आठवली. जिथे पाहटे ४ ते रात्री १२ पर्यंत कुठल्याही वेळी खायला मिळतं.
दुसऱ्याच दिवशी मी शहराजवळील एका गरिबांच्या वस्तीत ४ शीख मुलं राहत होती तिथे राहायला आलो. इथे मला एका दिवसाचे फक्त ५ युरो एवढं भाडं द्यावं लागणार होतं.
सगळे सकाळी उठून कामावर जायचे. मी दिवसभर नेटवर काही नवीन काम मिळतंय का ते शोधत रहायचो. असा एक महिना गेला. होते नव्हते ते पैसे संपले. सफाळ्याच्या एका नादान माणसाकडे माझी ८० हजार रुपये अडकले होते. ते जरी मिळाले असते तरी मला महिने दोन महिने इथे काढता आले असते. तोपर्यंत पुढल्या वर्षीचा पिकाचा मोसम सुरु झाला असता. पण तो नादान माणूस राजकारणी असल्यामुळे फक्त ‘तारीख पे तारीख’ देत होता पण पैसे काही देत नव्हता. मी एवढा हताष झालो होतो की दिवसभर कामासाठी वणवण केल्यामुळे थकून लगेच झोप लागायची पण चिंतेमुळे रात्री २ च्या आसपास जाग यायची.
१८.१२.२०१८ रोजी माझ्याकडे जेवणाचे पैसेही नव्हते. सगळे शीख कामाला निघून गेले. मी थोडा भात शिजवला आणि दुधाबरोबर खाल्ला. संध्याकाळी एक जण लवकर आला. त्याने चौकशी केल्यावर मी त्याला खरी परिस्थिती सांगितली. त्याने म्हटलं, हात्तीच्या, एवढंच नं? मग मला आधी नाही का सांगायचं? मला इथे येवून महिना झाला. मलाही काही काम मिळत नाही म्हणून मी इथल्या गुरुद्वारात जावून सेवा करतो आणि तिथेच जेवून येतो. उद्या तू पण चल.
१९.१२.२०१८. आज सकाळीच मी त्याच्याबरोबर ४८ मिनिटं चालून गुरुद्वारात पोहोचलो. दोघांकडेही तिकिटाचे पैसे नव्हते म्हणून चालत निघालो. ग्रंथसाहिबला डोकं टेकवून नमस्कार करून प्रसाद घ्यायला गेलो तेव्हा नेहमीप्रमाणे उजवाच हात पुढे केला. प्रसाद देणाऱ्याने दोनो हाथ आगे करो असं म्हटल्यावर मी तसं केलं. त्याने हातात शुद्ध दुध आणि साजूक तुपाने बनवलेला बुंदीचा लाडू ठेवला. तिथे थोडा वेळ बसून खाली जेवणाच्या ठिकाणी आलो तेव्हा एका ख्रिश्चन मित्राने दिलेला सल्ला आठवला. हा मित्रही असाच भूक लागली आणि पैसे नव्हते तेव्हा गुरुद्वारात जेवायला गेला होता. तिथे ताटात भाजी वाढून झाली की चपाती वाढायला येतात तेव्हा दोन्ही हात पुढे करायचे असतात. आपल्या ओंजळीत वाढणारा आपल्या हाताला स्पर्श न करता चपाती टाकतो. हे माझ्या मित्राला आवडलं नव्हतं. त्याने मला सांगितलं होतं की तिथे चपाती भिकाऱ्यासारखी हाताची ओंजळ करून मागावी लागते आणि ती आपल्या हातात फेकतात. ही गोष्ट मला तिथे गेल्यावर आठवली.
माझ्याच रांगेत खूपच उंची कपडे घातलेला एक शीख बसला होता. वाढपी त्याच्या समोर आल्यावर त्याने ओंजळ पुढे केली आणि वाढणाऱ्याने त्याच्या हातात चपाती वाढली. त्याने ती ताटात ठेवली आणि पुन्हा हात पुढे केला. त्याने दुसरी चपाती दिली. त्यात मला काहीही गैर वाटलं नाही. आपण इथे फुकट जेवायला आलोय म्हणजे आपण याचक आहोत. याचकाची ओंजळ नेहमी खालीच असते. जर इथले नियम मान्य नसतील तर इथे येवूच नये असं मला वाटलं. मी ओंजळ पुढे केली. त्याने चपाती हातात ठेवली. मी ती ताटात ठेवून पुन्हा ओंजळ पुढे केली. त्याने दुसरी चपाती हातात ठेवली. मी पुन्हा ओंजळ पुढे केली. त्याने तिसरी चपाती हातात ठेवली आणि माझ्यासमोर थांबून राहिला. मी ‘शुक्रिया’ असं म्हणून नमस्कार केला. तो पुढे निघून गेला. एका पंजाबी मुलीने माझ्या ताटात भाजी वाढली. मी तीन चपात्या संपल्यावर पुन्हा चपाती मागितली. तो पुन्हा चपात्या घेवून आला आणि त्याने माझ्या ओंजळीत चौथी चपाती वाढली आणि एका पंजाबी मुलीने मला पुन्हा भाजी वाढली आणि ती खाण्यासाठी एक चमचा दिला. जेवण संपत असताना दुसऱ्या एका पंजाबी मुलीने मला बुंदीचा लाडू दिला. एक चपाती सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी ताटात वाढत होते. पोट भरून जेवलो आणि स्वत:चं ताट स्वत: धुवून ठेवलं.
जेवण झाल्यावर पुन्हा थोडा वेळ ग्रंथसाहेब समोर थोडा वेळ बसलो तेव्हा इस्कॉन, शीख आणि जैन लोकांनी जसं जगभरच्या भुकेल्या पण खिच्यात पैसे नसलेल्या लोकांसाठी सोय करून ठेवली आहे तशी आपल्या मराठी लोकांनीही गोंदवल्याला जशी गेली सव्वाशे वर्ष सोय करून ठेवली आहे तशी जगभर करावी असं वाटलं.
निघण्याआधी पुन्हा एकदा ग्रंथसाहेबासमोर डोकं टेकवलं तेव्हा डोळ्यांत पाणी होतं.
**********
पत्ता : मिलिंद चौबळ,
खोली क्र. ५, घर क्र. ८६,
मु. पो. उंबरपाडा (सफाळे),
ता. व जिल्हा : पालघर,
पिन : ४०११०२.

दूरध्वनी : ८८३०६९१७०९ (WhatsApp), ९८५०२५०७७६.

इमेल्स : milindchaubal@gmail.com, milindchaubal@yahoo.com.


No comments:

Post a Comment