Friday, February 22, 2019

(कुवेत कथा)-मळभ.



मळभ
ते २००३ साल होतं. मार्च महिना होता. दिवस अत्यंत कडकीचे होते. सायबर कॅफे आताच विकला होता आणि कुवेतच्या नोकरीसाठी व्हिसाची वाट पाहत होतो. डोक्यावर कर्ज होतं. जोपर्यंत धंदा सुरु होता तोपर्यंत बँकेचे कर्जाचे हप्ते भरायला काही वाटत नव्हतं. पण दोन नोकऱ्यांच्या मधला ‘बेकारीचा’ काळ सुरु होता. त्यामुळे चिंतेत होतो. बुश साहेबांनी इराकवर हल्ला केल्याने तिथे युद्ध सुरु होतं त्यामुळे व्हिसाही येत नव्हता.
महिन्यामागून महिने चालले होते. पुंजी संपत आली होती. लवकर कुवेतला गेलो नाही तर मित्रांकडून पैसे मागायची वेळ आली असती. बायको नोकरी करत होती पण तिच्याकडून पैसे मागणं माझ्या प्रचंड ‘इगो’ ला मानवलं नसतं.
ती रविवारची सकाळ होती. दुध आणि पेपर आणण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा माझ्या ४ वर्षाच्या मुलीलाही (पूर्णाला) बरोबर घेतलं. नाक्यावर गेलो तेव्हा पेपरवाला अजून यायचा होता. मग जिथून दुध घेतलं त्या हॉटेल कम डेरीच्या एका बाकड्यावर बसलो. त्या हॉटेलच्या मालकाने फुटपाथवरचा बराचसा भाग अनधिकृतपणे अडवून बाहेरही ४ टेबलं आणि खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यातल्याच एका खुर्चीवर बसून मी पेपरवाल्याची वाट पाहू लागलो.
काही लोकं जवळच्याच बाकावर बसून मिसळ, वडापाव, भजीपाव, चहा असा नाश्ता करत होते. वातवरण कुंद होतं. मार्च महिना असूनही ढग जमले होते. मळभ होतं त्यामुळे कशातच मूड लागत नव्हता.
धंदा विकलेला, डोक्यावर कर्ज, नवीन नोकरीला कुवेतला जायचं तर सालं तिथे युद्ध सुरु होतं. कोणतीही गोष्ट मनासारखी होत नव्हती. रोज येणारा पेपरवालाही अजून आला नव्हता. सालं हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं? साला हा दिवसही एवढा फालतू कसा? अशी छातीत वाफ का कोंडल्यासारखी वाटतेय? पूर्णाही एवढे कसले प्रश्न विचारतेय?
काय रे बाळा? मी तिला विचारलं.
बाबा, तो माणूस बघा कशी उष्टी बशी चाटतोय. वेडाच आहे नुसता.
मी पाहिलं तेव्हा खरंच एक भिकाऱ्यासारखा दिसणारा माणूस नाश्ता संपवून नुकत्याच उठून गेलेल्या एका माणसाची मिसळ असलेली उष्टी बशी चाटत होता. गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे मी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तेव्हा ‘रोजचंच आहे’ अशा अर्थाची त्याने खुण केली. पुढे खालच्या आवाजात तो म्हणाला, ‘तो भिकारी नेहमी तिथे येतो आणि ह्या बाहेरच्या बाकांवर बसून नाश्ता करायला बसलेला एखादा माणूस उठून गेला की उष्ट्या बशा चाटत राहतो. हाकलून दिलं तर कायदे शिकवतो की ‘सरकारच्या जागेवर तुम्ही बेकायदेशीरपणे बाकडी टाकुन धंदा करता ते कसं चालतं?’ आम्हीही दुर्लक्ष करतो कारण थोड्या वेळाने पोट भरलं की निघून जातो. त्याची दुसरी काही कटकट नाही. हॉटेलच्या आतही कधी जात नाही. जुनी ओळख आहे. शाळेत बाबांच्या वर्गात होता’ वगैरे वगैरे.
बाबा, शहाण्या माणसाने अशी उष्टी बशी चाटायची असते का? हो की नाही? मी त्याला सांगू का असं करू नको म्हणून? पूर्णा म्हणाली.
बाळा त्याला भूक लागलेय, म्हणून तो खातोय. खाऊ दे त्याला. मी म्हणालो.
मग तो आख्खा वडा का खात नाही? बशी चाटून त्याचा पोटु थोडाच भरणार आहे?
तो गरीब आहे. त्याच्याकडे वडा विकत घ्यायला पैसे नाहीत.
बाबा, मग तुम्ही त्याला वडा घेऊन द्या ना. तुमच्याकडे कितीतरी पैसे आहेत. माझ्याकडची ‘चिल्लर’ म्हणजे तिला ‘खूप पैसे’ वाटत होते.
आता हिला काय सांगणार की माझ्या डोक्यावर केवढं कर्ज आहे ते. म्हणून तिची समजूत घालायला मी म्हटलं, त्याला आपण विकत घेऊन दिला तरी तो खाणार नाही. त्याला दुसऱ्याचं उष्टं खायची सवय लागली आहे.
हो का? अगदी वेडाच आहे नुस्ता. पूर्णा म्हणाली. तिची समजूत पटली म्हणून मला बरं वाटलं.
थोडा वेळ गेल्यावर मी कंटाळून उठणार एवढ्यात पूर्णा म्हणाली, बाबा, मला एक वडा द्या ना.
नको, खोकला होईल.
फक्त एक वडा खाल्ला तर होणार नाही असं आपले डॉक्टर काका म्हणाले होते की नाही? मला एक वडा द्या ना हो बाबा. द्या ना हो. पूर्णा हट्टच घरून बसली.
पूर्णाचा एवढा हट्ट पुरवायलाच हवा होता कारण लवकरच मी परदेशात जाणार होतो आणि वर्षभर तिच्यापासून लांब राहणार होतो. म्हणून मी एक वडापावाची ऑर्डर दिली. वेटरने तिला आवडेल म्हणून मिकी माउसचं चित्रं असलेल्या लाल भडक बशीत वडापाव आणून दिला. एवढ्यात पेपरवाला आला. मी पेपर घ्यायला त्याच्या जवळ गेलो.
पेपर्सचे गठ्ठे सोडवेपर्यंत ३-४ मिनिटं गेली. पेपर घेतले आणि पूर्णा कुठे आहे ते पाहू लागलो तर ती कुठेच दिसेना. हॉटेलच्या आत तर गेली नाही ना असं वाटून मी आत गेलो पण ती आतही नव्हती. बाहेर लक्ष गेलं तर ती त्या पेपरवाल्याच्या बाजूला उभी राहून कुठल्यातरी मासिकावरचं रंगीत चित्रं पाहत होती. एवढ्या लवकर हिचा वडापाव कसा खाऊन झाला म्हणून तिला विचारलं. तर ती काही बोलेचना.
कुवेतचं युद्ध कधी संपतंय याची उत्सुकता असल्याने पेपर चाळतच घरी यायला निघालो आणि हॉटेलच्या मालकाने हाक मारली. मी दुधाची पिशवी टेबलावरचं विसरलो होतो. ती घ्यायला गेलो तर मगासचा तो भिकाऱ्यासारखा दिसणारा माणूस मी पूर्णासाठी मागवलेली वडापावाची मिकी माउसचं चित्रं असलेली लाल भडक बशी फस्त करत असलेला दिसला. त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं.
म्हणजे नक्कीच याने माझ्या मुलीसाठी मागवलेली डिश हिसकावून घेतली असणार. म्हणूनच ती एवढ्या पट्कन बाहेर आली असा माझ्या मनात विचार आला. घाबरली असेल बिचारी. म्हणूनच मगाशी ‘वडापाव एवढ्या लवकर संपला?’ असं विचारलं तेव्हा ती गप्पच बसली. मला त्या भिकाऱ्याचा रागच आला.
पूर्णाजवळ गेलो आणि तिला म्हणालो, बाळा, त्या भिकाऱ्याने तुझी बशी घेतली तर मला हाक का मारली नाहीस?
त्याने नाही घेतली बाबा. मीच वडापावाचा एक चावा घेवून ती बशी तिथेच ठेवून आले.
क्काय? पण का?
त्या हॉटेलातल्या काकाने मला वडापाव दिल्यावर मी त्या वेड्या माणसाला तो दिला. तर तो नको म्हणाला. मग मला आठवलं. तुम्ही मला आत्ताच सांगितलं होतं नाही का, की तो वेडा माणूस फक्त दुसऱ्याचं उष्टंच खातो म्हणून? म्हणून मी वड्याचा एक चावा घेतला आणि तो तसाच बशीत ठेवून तुमच्या बाजूला येऊन उभी राहिले. मग त्याने माझी बशी घेतली. बिचाऱ्याला खूप भूक लागली होती नाही का हो बाबा?
मी तिला काय उत्तर देणार? आंधळ्या भिकाऱ्याच्या झोळीत खेळणं विकत घेण्यासाठी वर्षभर जमवलेली पिगीबँक रिकामी करणारी माझी मुलगी मला एक फार मोठा धडा देऊन गेली. रस्ता अचानक वेडावाकडा दिसायला लागला. डोळ्यांत पाणी आलं होतं. तिचा हात धरून घराच्या दिशेने चालू लागलो.
अचानक सूर्यापुढले ढग बाजूला झाले, मळभ दूर झालं. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आणि एका सुंदर दिवसाची सुरुवात झाली.

*********************
पत्ता : मिलिंद चौबळ.
खोली क्र. ५, घर क्र. ८६,
मु. पो. उंबरपाडा (सफाळे),
ता. व जिल्हा : पालघर,
पिन : ४०११०२.

दूरध्वनी : ८८३०६९१७०९ (WhatsApp).
दूरध्वनी (युरोप) : (+३५१) ९२०१४१५८०.





No comments:

Post a Comment