Friday, February 22, 2019

एकवीरा!


एकविरा
      शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी ४ च्या दरम्यान राजेंद्रचा मला फोन आला. तो सहकुटुंब लोणावळ्याला चालला होता. त्याची आणि माझी कुलस्वामिनी एकविरा माता आहे. मी गेली अनेक वर्ष परदेशांत राहिल्याने मातेचं दर्शन घेऊ शकलो नव्हतो. शिवाय माझ्या अणु अणु आयुष्यह्या पुण्याच्या अक्षर मानवह्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या माझ्या वाटेच्या प्रतीही मला पुण्याहून आणायच्या होत्या. म्हणून मी सगळ्या मित्रांना दोन तीन महिने आधीपासूनच मला पुण्याला आणि लोणावळ्याला कामं आहेत, कोणी जात असेल आणि एक जागा रिकामी असेल तर सांगा असं सांगून ठेवलं होतं. त्याप्रमाणे राजेंद्रचं लोणावळ्याला जाण्याचं ठरल्याबरोब्बर त्याने मला सांगितलं होतं आणि मी त्याच्याबरोबर निघालो होतो. तो, त्याची बायको, मुलगी आणि नात असे त्याच्या मारुती ८०० गाडीतून निघाले होते. तो स्वत:च ड्रायव्हर असल्याने एक जागा रिकामी होती. तिथे त्याने माझी व्यवस्था केली होती.
      रात्री ८ वाजता लोणावळ्याला पोहोचलो तेव्हा मला हे माहितच नव्हतं की त्याच्या नातेवाइकांपैकी एकाच्या लहान मुलाचं जावळ करण्याचा मोठा समारंभ ठरला होता आणि त्यासाठी त्यांनी एक मोठा बंगलाच भाड्याने घेतला होता आणि जवळ जवळ ५०-६० लोकं तिथे आली होती. तिथे गेल्यावर गर्दी पाहून मी त्याला विचारलं तेव्हा त्याने मला ही माहिती दिली. मला एकविरा मातेचं दर्शन तर घ्यायचं होतंच पण पुण्याला जाऊन पुस्तकंही आणायची होती. राजेंद्र एकटाच असता तर मी पट्कन त्याच्याबरोबर २-३ तासांत पुण्याला जाऊन येऊ शकलो असतो. पण इथे तर मोठा लग्नासारखा समारंभ होता. तरीही मी जेव्हा राजेंद्रला म्हटलं की उद्या आपण दोघेच दुपारी पुण्याला जाऊन येऊ, मी पेट्रोलचा खर्च करीन तेव्हा तो बघू या, कसं जमतंय तेअसं म्हणाला तेव्हाच मला अंदाज आला की एवढा मोठा समारंभ सोडून त्याची पुण्याला येण्याची इच्छा नाही आहे.
      माझ्याकडच्या व्हिडीओ कॅमेऱ्याने मी प्रवासांत तर शुटींग केलंच होतं पण तिथे दारू पिऊन जे नाचगाणं चाललं होतं त्याचं पण मी शुटींग केलं. रात्री खूप उशिरा एका चटईवर अंग टाकलं आणि उशाला कपड्यांची बॅग घेऊन झोपलो तेव्हा थकल्यामुळे मिनिटभरात झोप लागली. राजेंद्र मात्र बाहेर नाचतच होता.
      रविवार दि. १६ नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे ५ च्या दरम्यान उठलो तेव्हा माझ्या आधीच उठून राजेंद्रची बायको, मुलगी आणि इतर काही बायका आंघोळी वगैरे करून मातेच्या दर्शनाला गेल्या होत्या. सकाळचा सूर्योदय टिपण्यासाठी मी कॅमेरा काढला तर तो चालत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी झोपल्यावर बहुतेक कोणीतरी तो गुपचूप काढून वापरण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यात तो बिघडला असावा असा अंदाज मी केला. मी राजेंद्रला शोधलं तर तो बंगल्याबाहेर त्याच्या कारमध्ये झोपलेला मला दिसला. मोरीत पाणी नव्हतं म्हणून मी अंघोळ करू शकलो नाही. ७ च्या दरम्यान राजेंद्रची बायको दर्शन घेऊन आली आणि तिने मला लवकर आंघोळ करून निघा आणि दर्शन घेऊन या, आता गर्दी नाही असं सांगितलं तेव्हा मी आंघोळीसाठी पाणी नसल्याचं तिला सांगितलं. मी राजेंद्र उठण्याची वाट पाहत बसलो. तो साडेआठला उठला. त्याने बंगल्याच्या मालकाशी फोनवर बोलून पाण्याची व्यवस्था केली. माझी अंघोळ होईपर्यंत दुपारचे ११ वाजले. १२ च्या दरम्यान जावळ करण्यासाठी वऱ्हाड निघालं तेव्हा मी ही त्यांच्याबरोबर मातेच्या मंदिरात गेलो. तिथे २ किलोमीटर लांबी रांग होती. पण जावळ करायचं असल्याने काही महत्वाच्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश देत होते त्यात माझा नंबर लागला. मी आता जाऊन मातेचं दर्शन घेतलं तेव्हा डोळे पाणावले. कारण याआधी जवळ जवळ १४-१५ वर्षांपूर्वी जेव्हा मातेच्या दर्शनाला आलो होतो तेव्हा मी एक तरूण, तडफदार, कुटुंबवत्सल, परदेशी स्थायिक झालेला यशस्वी इंजिनिअर होतो. आता मात्र मी एक घटस्फोटीत, घरदार घालवून बसलेला, नोकरी नसलेला, जराजर्जर, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला म्हातारा माणूस होतो. १०-१५ वर्षांत होत्याचं नव्हतं झालं होतं. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. त्या पाण्यात माझं आरोग्य, संपत्ती, सुख, घरदार सगळं काही धुऊन गेलं होतं.
      बंगल्यावर परत येऊन जेवेपर्यंत दुपारचे २ वाजले. मी राजेंद्रला पुन्हा एकदा पुण्याला काम असल्याची आठवण करून दिली. तेव्हा त्याने, “तूच एकटा जाऊन ये, मला इथून निघता येणार नाहीअसं सांगितलं. मी एकटाच पुण्याला निघालो. लोणावळा बस डेपोपासून मातेचं मंदीर अंदाजे ८ किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य रस्त्यापासून मातेच्या मंदिराच्या पायऱ्या अंदाजे १ किलोमिटरवर सुरु होतात आणि आम्ही ज्या बंगल्यात उतरलो होतो तो अंदाजे अर्ध्या किलोमिटरवर होता. मी पुण्याला जाणाऱ्या बसची वाट पाहत मुख्य रस्त्यावर उभा राहिलो. पण बस मिळत नव्हती. मग डेपोच्या दिशेने जाणारी रिक्षा पडकून मी लोणावळा बस डेपोला आलो आणि तिथून पुण्याला जाणारी बस पडकली तेव्हा दुपारचे ३ वाजले होते. मला अशी भीती वाटू लागली की मी परत येईपर्यंत राजेंद्र जर निघून गेला तर? कारण त्याच्यासकट सगळे सतत पीत होते. नशेत तो मला विसरला तर? हृद्यविकाराचा पहिला झटका येऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मला एक किलोच्या वर वजन उचलायचं नाही अशी कडक ताकीद दिली होती. अशा परिस्थितीत हातात १५-२० किलो वजनाची पुस्तकं घेऊन मी सफाळ्यापर्यंत कसा प्रवास करणार? माझी ही भीती खरी ठरणार आहे हे मला तेव्हा माहिती नव्हतं.
      प्रसिद्ध लेखक श्री. राजन खान यांना मी सतत मी कुठपर्यंत पोहोचलो आहे ते फोन करून सांगत होतो. पण एकतर तो रवीवार होता आणि खानसाहेब फक्त माझ्यासाठी कार्यालयांत आले होते. पण मला निघायलाच एवढा उशीर झाला होता की मी जेव्हा ४ च्या दरम्यान स्वारगेट बस डेपोजवळ असलेल्या अक्षर मानवरच्या कार्यालयांत जाऊन पोहोचलो तेव्हा खान साहेब माझी वाट पाहून दुसरं कुठलं तरी काम करण्यासाठी जवळच कुठेतरी गेले होते. मी जिन्याच्या पायरीवर त्यांची वाट पाहत थांबलो. ते आणि तेजूताई ५ च्या दरम्यान आले. मी त्यांच्याशी बोलत असताना घड्याळाकडे पाहिलं तर खानसाहेब म्हणाले, “महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध व्यक्ती तुमच्यासाठी रविवारी इतक्या लांब आली आणि तुम्ही घड्याळ पाहता?” मी त्यांना माझी अडचण सांगितली तेव्हा ते म्हणाले, बरं मग मालक, निघा तुम्ही. हातात जेवढी नेता येतील तेवढी पुस्तकं घ्या.”
      मी अंदाजे एका हातात १०-१० किलो अशी दोन हातात २० किलो पुस्तकं घेऊन स्वारगेट बस डेपोला आलो आणि बोरिवलीला जाणारी बस पकडली. तिकीट फक्त लोणावळ्याचं काढलं. बस सुटली तेव्हा ५:३० झाले होते. म्हणजे तासाभरात ती लोणावळ्याला पोहोचेन असा अंदाज करून मी राजेंद्रला फोन केला. फोन वाजला पण त्याने तो उचलला नाही. तासाभरात मी जवळ जवळ १०० वेळा फोन केला. कदाचित माझा फोन तो मुद्दाम घेत नसेल असं वाटून मी बाजूच्या एका प्रवाश्याचा फोन घेऊन राजेंद्रला फोन केला पण तो फोन उचलतच नव्हता. पावणेसात वाजता बस मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या फाट्यावर आली तेव्हा मी विचार केला की इथे न उतरता लोणावळ्याला किंवा थेट बोरिवलीला उतरू या. पण बोरिवलीला रात्री ११ च्या दरम्यान बस पोहोचणार. बोरीवली डेपोपासून रेल्वे स्टेशन १० मिनिटांवर आहे. जरी विरारच्या मित्राकडे रात्री रहायचा विचार केला तरी एवढं वजन घेऊन १० मिनिटं स्टेशनपर्यंत कसा जाणार? स्टेशनचे जिने चढावे लागतील ते वेगळेच. एवढं सामान घेऊन लोकलमध्ये कसा चढणार? बोरिवलीच्या मित्राकडे जाऊ शकत नव्हतो कारण तो गेले २-३ दिवस गावी रहायला गेला होता. सगळ्यांत उत्तम हेच ठरलं असतं की मी लोणावळा येण्याच्या आधी मातेच्या मंदिराकडे जो फाटा जातो तिथे उतरून वऱ्हाड उतरलं होतं तिथे जायचं आणि राजेंद्रच्या कारच्या डिकीमध्ये पुस्तकं ठेऊन कारने घरी जायचं.
      मी मंदिराकडे जाणाऱ्या फाट्यावर पावणे सातच्या दरम्यान उतरलो तेव्हा त्या रस्त्यावर मिट्ट काळोख पसरला होता. लोणावळ्याहून पुण्याला जाणाऱ्या मुख्य रस्यावर भगभगीत दिवे आहेत पण मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्ण अंधारात होता. हातात दोन पुस्तकांचे गठ्ठे घेऊन एक एक पाउल अंदाजे चालत, ठेचा खात खात मी बंगला गाठला आणि माझ्या  काळजात धस्सं झालं. बंगल्याला कुलूप होतं.
      मी व्हरांड्यात पुस्तकांचे गठ्ठे ठेवले आणि बाजूच्या बंगल्याचं दार वाजवलं. एका माणसाने दार उघडलं. मी त्याला त्या बंगल्यातल वऱ्हाड कुठे गेलं?” असं विचाल्यावर त्याने म्हटलं, “ते तर सगळे ४ वाजताच बंगला खाली करून निघून गेले.”
      क्काय? चार वाजता?मी आश्चर्याने विचारलं.
      हो. त्यांचं contract संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच बंगला वापरण्याचं ठरलं होतं. मालकाने मलाच त्यांचाकडून किल्ली घेऊन ठेवायला सांगितली होती. मी ती बरोब्बर ४ वाजता घेतली आणि बंगला बंद केला. का हो साहेब, तुम्ही पण त्यांच्याबरोबर होते का?”
      हो. पण माझं पुण्याला एक काम होतं म्हणून मी ते करायला गेलो होतो. मला घेतल्याशिवाय ते गेलेच कसे?”
      सगळे पिऊन फेस झाले होते साहेब. तुम्हाला विसरले असतील. लोणावळा डेपोच्या बाजूला चांगली हॉटेलं आहेत बघा. तिथे रात्रभर रहा साहेब तुम्ही.” त्याने मला सल्ला दिला.
      तुम्ही मला थोडी मदत कराला का? मला फक्त एक चटई द्या, मी त्या बंगल्याच्या व्हरांड्यात रात्रभर झोपतो. भल्या पहाटे तुमची चटई परत करून मी मुंबईला जाईन.”
      ते कसं जमणार? मी इथे राहत नाही. माझं थोडं काम होतं म्हणून आलो होतो आणि तुम्ही भेटलांत. चटया, गाद्या, उषा, खुर्च्या हे सगळं भाड्याने आणलं होतं. आता त्या आणि ह्या बंगल्यांतही काहीही नाही. तुम्ही डेपोलाच जा साहेब. तिथे एखादं हॉटेल बघा.” असं म्हणून सायकलवर टांग मारून तो निघून गेला.
      मला ब्रम्हांडं आठवलं. मी अंधारात चाचपडत, ठेचकाळत पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने चालू लागलो. ते अर्धा किलोमीटर अंतर जायला मला चांगली २० मिनिटं लागली. मुख्य रस्त्यावरचे दिवे लांब दिसू लागले आणि राजेंद्रचा फोन आला. मी हातातलं सामान रस्त्यावर ठेऊन खिच्यातून फोन काढून घेतला. मी त्याला काय झालं आहे ते सांगितलं. “अरे माझ्या नातवाची प्रकृती अचानक बिघडली म्हणून मी घाईघाईत निघालो. गडबडीत तुला विसरलोच. थोडी जास्त पण झाली होती यार. आता ठाण्याला पोहोचलो आहे. तासाभरात सफाळ्याला पोचेन.” राजेंद्र म्हणाला.
      राजेंद्र मी हार्ट पेशंट आहे. मला डॉक्टरांनी एक किलोच्या वर वजन उचलायचं नाही असं सांगितलं आहे आणि मी आत्ता दोन हातात २० किलो वजन घेऊन अंधारात चाचपडत मुख्य रस्त्याच्या दिशेने जातो आहे. मी काय करू ते तूच सांग.” मी रडकुंडीला येऊन म्हणालो.
      तू रिक्षा करून लोणावळा डेपोला जा. तिथून तुला मुंबईला जाणारी बस मिळेल. मुंबईला एखाद्या मित्राकडे रात्री रहा आणि सकाळी घरी ये.” त्याने मला सल्ला दिला.
      अरे पण एवढं सामान घेऊन मी रेल्वेचे जिने कसे चढू? बोरिवलीहून शेवटची लोकल चुकली तर विरारच्या मित्राकडे कसा जाऊ?”
      ठीक आहे, मी परत येतो. माझ्या नातवाचं काय होईल ते होवो.राजेंद्र बोलला. मला धक्काच बसला. त्याच्या नातवाचं काही बरंवाईट झालं तर मला मरेपर्यंत ती खंत राहीली असती.
      नको, तू नको परत येउस. मी येतो कसा तरी.मी म्हणालो.
      त्यापेक्षा तू लोणावळ्यालाच एखाद्या हॉटेलात रात्रभर रहा आणि सकाळी मुंबईला ये.त्याने सल्ला दिला आणि फोन बंद केला. सामान उचलताना माझं लक्ष मातेचं मंदिर ज्या डोंगरावर आहे तिथे गेलं. रात्रीच्या अंधारात मातेच्या वाटेवरचे दिवे लुकलुकताना दिसत होते.
      मी अंधारात चाचपडत, ठेचकाळत पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने चालू लागलो. मुख्य रस्त्यावर आलो आणि लोणावळ्याच्या दिशेने जाणारी रिक्षा मिळते का ते पाहू लागलो. २० मिनिटं झाली तरी एकही रिक्षा आली नाही. मला मैलोन मैल चालायची सवय होती पण हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यापासून मी रोज फक्त १ किलोमीटर चालतो. लोणावळा डेपो तर तीथुन चांगला ८ किलोमीटरवर आहे. हातात एवढं सामान घेऊन मी चालत कसा जाणार?
      आणखी २० मिनिटं गेल्यावर माझा धीरच खचला. रडायला येऊ लागलं. पुस्तकं तिथेच फुटपाथवर ठेवून सरळ डेपोच्या दिशेने चाल मारावी असं वाटू लागलं. पण पुस्तकं हातातून सुटत नव्हती. परत बंगल्यावर जाऊन व्हरांड्यातल्या थंडगार फरशीवर झोपून जावं असं वाटू लागलं. पण पुन्हा त्या मिट्ट काळोखातून चालायचा धीर होत नव्हता.
      मुख्य रस्त्यावर येऊन एक तास झाला. सगळं सुनसान होतं. एखादं दुसरं वाहन जात होतं पण रिक्षा किंवा भाड्याची कार येत नव्हती. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. मी मागे वळून पुन्हा बंगल्याच्या दिशेने जाऊ शकेन का याचा अंदाज घेऊ लागलो आणि मला डोंगरावरचे मातेच्या मंदिराकडे जाणारे दिवे दिसले. मी मातेला हात जोडले आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणालो, “आई, मला मदत कर. आई, मदत कर. आई, मदत कर. आई, मदत कर. आई, मदत कर. आई, मदत कर. आई, मदत कर. आई, मदत कर. आई, मदत कर.”
      आणि......
      आणि त्या अंधाऱ्या रस्यावरून माझ्याच दिशेने येणारे दोन मोटारसायकलचे दिवे मला दिसले. मी दोघांनाही हात केला पण पहिला स्वार न थांबता निघून गेला. दुसरा मात्र थोडं पुढे जाऊन थांबला. मी धाव्वत त्याच्या जवळ गेलो आणि हात जोडूनत्याला म्हणालो, भाऊ, मी अडलेलो आहे. मित्रांबरोबर मुंबईहून इथे आलो होतो. पुण्याला एका कामासाठी गेलो आणि दारू प्यालेले मित्र मला सोडून निघून गेले. मला लोणावळा डेपोपर्यंत तुमच्या मोटार सायकलवर न्या. मी तुम्हाला १०० रुपये देईन. इथे १ तास झाला मी उभा आहे. एकही भाड्याचं वाहन मिळालं नाही. मी हार्ट पेशंट आहे. एवढं सामान हातात घेऊन ८-९ किलोमीटर कसा जाऊ?
      मुंबईला जाणारी शेवटची एशियाड बस तर आता गेली असेल. आता मुंबईला जाणारी बस मिळणार नाही साहेब तुम्हाला.” तो भला माणूस म्हणाला.
      मग मी एखाद्या हॉटेलांत राहीन आणि सकाळी जाईन. मला फक्त लोणावळा डेपोपर्यंत सोडा किंवा त्यापेक्षा जवळ एखादं हॉटेल असेल तर तिथे घेऊन चला. एवढी मदत करण्याची मी तुम्हाला १०० रुपये देईन.” मी त्याला हात जोडून काकुळतीला येऊन म्हणालो.
      पैशाचं राहू द्या हो साहेब. मी तुम्हाला प्रायव्हेट बसच्या डेपोवर सोडतो. तुम्हाला व्होल्व्हो कंपनीची  मुंबईला जाणारी बस पण मिळवून देतो. माझी तिथे ओळख आहे. काय समान आहे तुमच्याकडे?”
      मी लेखक आहे. माझ्याकडे फक्त पुस्तकांचे दोन गठ्ठे आहेत.”
      बाकीचं सामान? कपडे वगैरे?
      ते सगळं मित्र घेऊन गेले. फक्त मलाच न्यायला विसरले.” मी म्हणालो आणि पुस्तकांचे गठ्ठे घेऊन त्या भल्या माणसाच्या मोटारसायकलवर बसलो. गाडी सुरु झाली आणि मुख्य रस्त्याला लागली. उजव्या बाजूला मला देवीच्या मंदिराकडे जाणारे दिवे दिसले. मी भक्तीभावाने आईला हात जोडले आणि मदत पाठवल्याबद्दल तिचे आभार मानले. मी ज्या मोटार सायकलवर बसलो होतो ती कोणत्या कंपनीची, कोणत्या मॉडेलची गाडी होती ते कळत नव्हतं. खूप लहानपणी पाहिलेलं एन्फिल्डकंपनीचं बहुतेक क्रुसेडरमॉडेल असावं ते. एक मात्र खरं की गाडी अगदी हवेवर तरंगल्यासारखी, जराही गचके न बसता चालत होती. ‘हे भगवानसिनेमात परमात्मा भगवान श्रीकृष्ण संकटात सापडलेल्या परेश रावळला मदत करायला हार्ले डेव्हिडसनमोटार सायकलवरून येतो त्या प्रसंगाची मला उगीचच आठवण झाली.
      तो अनोळखी देवदूत मला एका मोठ्या हॉटेलच्या समोर असलेल्या मैदानात घेऊन आला. तिथे अनेक व्होल्व्हो गाड्या उभ्या होत्या. त्याने एका बसच्या ड्रायव्हरशी बोलून माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बस तर सगळी भरलेली आहे. पण ड्रायव्हरच्या बाजूला असलेली क्लिनरची सीट रिकामी आहे. तिच्याने तो तुम्हाला बोरिवलीला सोडेल. त्याचे ३५० रुपये होतील. त्याची पावती वगैरे मिळणार नाही. हे सगळे पैसे थेट ड्रायव्हरच्या खिच्यात जाणार आहेत.मी होकार दिला आणि त्याला ४५० रुपये काढून दिले. त्याने १०० रुपये परत केल्यावर मी ते त्याला परत देऊन मुलांसाठी खाऊ घेऊन जा भाऊ.असं म्हटलं आणि बळेबळेच त्याच्या हातात ते पैसे कोंबले. बस सुटायला थोडा अवकाश होता म्हणून मी हॉटेलच्या बगीच्यात असलेल्या एका बेंचवर बसलो आणि त्या भल्या माणसाला मी बोरिवलीला गेल्यावरही मला केवढा त्रास सहन करावा लागणार आहे हे सांगू लागलो.
      मला अचानक टेम्पोचा व्यवसाय करणाऱ्या माझ्या महेश गोरे नावाच्या मित्राचा फोन आला. “अरे मिलू, आहेस तरी कुठे? बरेच दिवस दिसला नाहीस? महेश म्हणाला. मी त्याला कुठे आहे ते सांगितलं आणि काय घडलं आहे ते ही सांगितलं. मी पण टेम्पो घेऊन मुंबईलाच आलो आहे. तुला मी चेंबूरच्या जवळपास माझ्या टेम्पोत घेऊ शकेन. तुझ्या बसच्या ड्रायव्हरला फोन दे म्हणजे तो कुठल्या रस्त्याने बोरिवलीला जाणार आहे ते मी त्याला विचारतो आणि तुला कुठे उतरवायचं ते त्याला सांगतो.” महेश म्हणाला. तेवढ्यात मला बसच्या ड्रायव्हरने हाक मारून बस सुटत असल्याचं सांगितलं. मी त्याला महेशबद्दल सांगून हातातला फोन त्याला दिला. तो महेशशी हिंदीत बोलला आणि मग मला म्हणाला, तुम्हारा दोस्त टामेडा टोल नाके पर रुकने वाला है. मै तुम्हे वहा उतार दुंगा.” त्याने मला त्याच्या जवळ असलेली क्लिनरची छोटी सीट उघडून दिली आणि त्यावर बसून मी पायाशी पुस्तकांचे गठ्ठे ठेवले.
      साहेब, तुम्ही रात्री उशिरा घरी पोहोचाल. पण सकाळी उठल्यावर फोन करून सुखरूप घरी गेलात हे मला सांगा. तुमचा नंबर काय आहे? मी तुम्हाला फोन करतो म्हणजे माझा नंबर तुमच्या फोनमध्ये येईल. सकाळी न विसरता फोन करा नाहीतर मला काळजी लागून राहील की हो.” बसच्या दाराबाहेर उभं राहून तो भला माणूस मला म्हणाला. मी त्याला नंबर दिल्यावर त्याने मला फोन केला. एवढ्यात बस सुरु झाली. माझ्या खिच्यातला फोन वाजू लागल्यावर मी तो बाहेर काढून त्याचा नंबर पाहणार एवढ्यात तो म्हणाला, “कशाला फोन बाहेर काढता? ही वेळ लक्षात ठेवा. तुमच्या मित्राच्या फोन नंबरशिवाय जो वेगळा नंबर दिसेल तो माझा नंबर. आता माझा नंबर सेव्ह करण्यात वेळ घालवू नका. बस सुटली की हो.” त्याचं वाक्य संपतंय एवढ्यात ड्रायव्हरने बसचा दरवाजा बंद केला.
रात्री ९ च्या दरम्यान बस सुटली आणि ज्याने मला तिथे आणलं होतं तो अनोळखी माणूस मला टाटा करून निघाला तेव्हा डोळे पुन्हा एकदा पाणावले. त्याने त्याचं नाव सांगितलं नव्हतं पण त्याच्या फोन नंबरवरून ते काढता आलं असतं. पण त्याने मोबाईल फोनचं सीम कार्ड विकत घेताना ते दुसऱ्याच्या नावावर घेतलं असेल तर? मग त्याचं नाव कसं कळणार? म्हणून त्याच्या मोटार सायकलचा नंबर पाहण्याचा मी प्रयत्न केला तर माझ्या लक्षात आलं की दूर दूर जाणाऱ्या त्याच्या मोटारसायकलच्या मागे नंबर प्लेटच नव्हती.
धावणाऱ्या बसच्या कंपनांमुळे मला झोप येऊ लागली. पण मी जर झोपलो आणि ड्रायव्हरही विसरला तर मला बोरिवलीला उतरावं लागलं असतं आणि महेश उगीचच वाट बघत थांबला असता म्हणून मी निग्रहाने जागाच राहिलो आणि अधून मधून भाईसाहब मुझे टामेडा टोल नाका उतरना है ये भुलना नही अशी त्याला आठवण करून देत राहिलो. मला हे माहितीच नव्हतं की टामेडा टोल नाका मुंबई पुणे रस्त्यावर दोन ठिकाणी आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जो टामेडा टोल नाका आहे त्यात आणि पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर जो टामेडा टोल नाका आहे त्यात एका मैलाचं अंतर आहे.
      टामेडा टोल नाका येण्याच्या आधी मला ड्रायव्हरने अभी एक मील के बाद आपको उतरना है असं सांगितलं तेव्हा मी महेशला फोन केला. “तू ये. मला तू दिसशीलच. मी तुझीच वाट पाहतोय.” महेश म्हणाला.
      मी टामेडा टोल नाक्यावर उतरलो तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. नवा कोरा टोल नाका बांधून झाला होता पण अजून सुरु झाला नव्हता हे तिथल्या नव्या कोऱ्या आणि निर्मनुष्य असलेल्या कार्यालयांवरून समजत होतं. माझी बस निघून गेली आणि मी महेशला फोन केला. “अरे मी तर टोल नाक्यावरच उभा आहे. तू कुठे आहेस?महेशने विचारलं.
टामेडा टोल नाक्यावर आहे. मोठ्या अक्षरांत इथे टामेडा टोल नाकाअसं लिहिलेलं आहे.” मी उत्तर दिलं.
अरे, मी पण तर टामेडा टोल नाक्यावरच उभा आहे. मलाही मोठ्या अक्षरांत लिहिलेलं दिसतंय.महेश म्हणाला.
एकाच नावाचे दोन टोल नाके तर नाहीत नं?मी विचारलं.
तुला आजूबाजूला काय दिसतंय ते सांग.”
      मला आजूबाजूला दिसत असलेल्या इमार्तींवरची निऑन अक्षरं मी वाचून दाखवली. त्यापैकी एक तर मोठी प्रचंड इमारत होती. ती नक्कीच तिथली प्रसिद्ध इमारत असणार. महेशने थोड्या वेळाने फोन करून मला सांगितलं, “तू ज्या खुणा सांगितल्यास त्या अप दिशेच्या टोल नाक्यावर आहेत. अरे तू चुकून अप दिशेच्या टामेडा टोल नाक्यावर उतरलास. तुला डाऊन दिशेच्या नाक्यावर उतरायचं होतं. मी तिथे येऊ शकत नाही कारण अप आणि डाऊन रस्ते पुढे ११ मैलांवर जोडले गेले आहेत. मला जाऊन येऊन २२ मैल टेम्पो चालवावा लागेल. त्यापेक्षा तूच एखाद्या रिक्षाने किंवा टॅक्सीने इथे ये.”
      मी होकार देऊन भाड्याचं एखादं वाहन मिळतं का ते पाहू लागलो. गाड्या भन्नाट वेगाने धावत होत्या पण मला २० मिनिटं झाली तरी एकही वाहन मिळालं नाही. त्या दरम्यान महेशचा दोन वेळा फोन येऊन गेला. मी जिथे उभा होतो त्यापासून १००-१५० फुटांवर पुण्याच्या दिशेला रस्त्याला लागुनच एक लहानसं मैदान होतं आणि तिथे अंधारही होता. माझ्या लक्षात आलं की तिथे एक दोन गाड्या थांबून त्यातली माणसं उतरून अंधारात आडोश्याला जाऊन लघवी करून आली होती. मला जर एखादं वाहन मिळालं तर ते तिथेच मिळालं असतं म्हणून मी पुस्तकांचे गठ्ठे घेऊन तिथे गेलो आणि एखादं वाहन थांबतं का ते पाहू लागलो.
      १०-१५ मिनिटांनी एक कार थांबली आणि त्यातून एक जण खाली उतरला. पण तो माझ्यापासून एवढ्या लांब होता की हातातले गठ्ठे घेऊन तिथे जाईपर्यंत कार चालूही झाली होती. माझ्या बाजूने ती कार जाऊ लागताच मी मुद्दाम इंग्रजीतून ओरडून म्हणालो, “Excuse“Brother, please help me.”त्याने ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं आणि भर वेगाने माझ्या समोरून ती कार निघून गेली. मी पुन्हा पुण्याच्या दिशेने दुसरं एखादं वाहन येतंय का पाहू लागलो आणि मला माझ्या पाठीमागून जोरजोराने वाजवलेला कारचा भोंगा ऐकू आला. मी मागे पाहिलं तर आताच माझ्याकडे दुर्लक्ष करून गेलेली कार थांबली होती. मी हातात पुस्तकांचे गठ्ठे घेऊन धावतच कारच्या जवळ गेलो आणि म्हणालो, “Sor“I came here with my drunkard friends for Godess Ekvira darshan. I had some work in Pune so I went there and my drunkard friends just forgot me and left for Bombay. Please take me to the other end of Tameda Toll Post.”
Why dont you phone them?  त्यातल्या एकाने मला विचारलं.
Since last 3-4 hours I am calling them Sir, but it seems that everybody is so much busy in enjoying that nobody is noticing that the mobile is ringing.मी म्हणालो.
बैठो यार. पैसे देनेकी जरुरत नही. बस एक किलोमीटर जाना है. आप रायटर हो क्या?” असं म्हणून त्याने मागचा दरवाजा उघडला. मी पुस्तकांचे गठ्ठे आत ठेऊन बसलो आणि कार सुरु झाली.
एक किलोमिटर गेल्यावर जेव्हा विरुद्ध बाजूला बांधलेलं चेक नाक्याचं नवं कोरं कार्यालय दिसलं आणि माझी वाट पाहत असलेला महेश दिसला तेव्हा मी पुन्हा एकदा एकविरा मातेचे आभार मानले. महेशला पाहिलं आणि माझ्या जीवात जीव आला. आता मी अगदी घराच्या दारापर्यंत सुखरूप जाणार ही खात्री पटली. डोळे पाणावले. महेश पण एवढा चांगला की त्याने कारच्या मालकाचे आभार मानले.
कारमधून उतरलो आणि महेशचा हात हातात घेतला तेव्हा गळा दाटला होता. महेश बरोबर त्याचा आणखी एक मित्र होता आणि तोच टेम्पो चालवत होता. मी आत चढलो आणि पायाशी पुस्तकांचे गठ्ठे ठेवले. महेशला मी मला भूक लागल्याचं सांगितलं. त्याने भाईंदर जवळ असलेल्या एका हॉटेलात जेऊ असं सांगितलं. टेम्पो सुरु झाल्यावर मी महेशला माझ्यावर आलेला प्रसंग सविस्तर सांगितला.
बोलताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. तेव्हा मी सोमवारचे उपवास करायचो. महेशच्या मित्राने हॉटेलसमोर जेव्हा टेम्पो थांबवला तेव्हा ११.४५ झाले होते. म्हणजे १५ मिनिटांत सोमवार उजाडणार होता. मी पट्कन ऑर्डर दिली. पण जेवण येईपर्यंत ११.५५ झाले होते. भोळ्या शंकराची क्षमा मागितली आणि जेवायला सुरुवात केली जेवण झालं तेव्हा १२.३० झाले होते.
जेऊन creditक्रेडीट कार्डचा वापर करून बिल भरलं आणि महेशने टेम्पो सुरु करून घराची वाट धरली. रात्री पावणेदोन वाजता महेशने घरासमोर टेम्पो थांबवला. त्याचा निरोप घेऊन पुस्तकांचे दोन गठ्ठे घेऊन घरात आलो आणि एकविरा मातेचे मनापासून आभार मानले. जर लोणावळ्याला थांबलो असतो तर आता ह्या क्षणी कुडकुडत बंगल्याच्या फरशीवर झोपलेला असतो. जर लोणावळ्याला न उतरता बोरिवलीला आलो असतो तर शेवटची विरार लोकल न मिळाल्याने platform फलाटावर थांबून रहावं लागलं असतं. जर बोरिवलीहून शेवटची विरार लोकल मिळाली असती तर मित्राच्या घरी अजूनही पोहोचू शकलो नसतो. आणि कुठल्याही स्थितीत हातात पुस्तकांचे गठ्ठे घेऊन हमाली करावी लागली असती. कमकुवत हृदयाची काय स्थिती झाली असती कोण जाणे.
पण संकटात पडल्यावर डोळ्यांत पाणी आणून १०० वेळा आई मला मदत कर, आई मला मदत कर अशी एकविरा मातेची प्रार्थना केली होती त्यामुळे तिच्या कृपेने अगदी घराच्या दारापर्यंत मित्राने आणून सोडलं होतं.
सकाळी रोजच्यापेक्षा थोडा उशीरच उठलो आणि अंघोळ वगैरे करून तयार झाल्यावर मी त्या भल्या माणसाला फोन करण्यासाठी माझा फोन हातात घेतला. रात्री जेवढे फोन मला आले होते आणि ज्यांना ज्यांना मी फोन केले होते त्या सगळ्यांचे नंबर मी तपासले. पण महेशच्या फोनच्या व्यतिरिक्त माझ्या फोनमध्ये कोणाचाही नंबर record झालेला नव्हता. पण मला तर खात्री होती की त्याने जेव्हा त्याचा नंबर देण्याकरता मला फोन केला होता तेव्हा तो अगदी खात्रीने माझ्या खिच्यात वाजला होता. पण मी मोबाईल खिच्यातून बाहेर काढणार एवढ्यात त्या भल्या माणसाने मला म्हटलं होतं की बस सुरू झाली आहे व मी नंतर त्याचा नंबर पहावा म्हणून.
कदाचित असं असेल की जेव्हा त्याचा नंबर देण्याकरता त्याने मला फोन केला तेव्हा त्याने चुकून दुसरा  नंबर फिरवला असेल आणि त्या नंबरला त्याचा फोन गेला असेल आणि त्याच वेळी महेशने मला फोन केल्यामुळे माझ्या खिच्यातला फोन महेशमुळे वाजला असेल.
किंवा......
किंवा तो देवदूतासारखा मदतीला आलेला आणि नंबर प्लेट नसलेली, हवेवर तरंगल्यासारखी, अनोळखी मॉडेलची मोटार सायकल चालवणारा फरिश्ता म्हणजे साक्षात एकविरा माता असेल.
***************
मिलिंद मनोहर चौबळ,
खोली क्र. , पाटकर चाळ,
उंबरपाडा पोस्ट ऑफिस जवळ,
सफाळे, ता. व जिल्हा : पालघर,
पिन : ४०११०२.

भ्रमणध्वनी : ९८५०२५०७७६ (WhatsApp), ८१४९२०२६००.

इमेल : milindchaubal@gmail.com, milindchaubal@yahoo.com.

No comments:

Post a Comment