Friday, February 22, 2019

(भूक)-परिमार्जन.

परिमार्जन.
काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राला एक छोटा अपघात झाला. त्याचं असं झालं. तो सातिवली (वसई) येथल्या एका छोट्या कंपनीत नोकरी करत असे. त्या विभागात अजूनही म्हणावी तशी प्रगती झालेली नाही आणि नेहमी वीज जाते. एकदा अशीच वीज गेल्यावर हातात मेणबत्तीचा छोटा तुकडा घेऊन तो मेणबत्त्या असलेलं खोकं कुठे ठेवलं आहे ते अंधारात शोधत होता. त्याला रंगकाम करण्याच्या जागेत ते एका फळीवर ठेवलेलं दिसलं. हातात पेटती मेणबत्ती घेवून तो तिथे गेला. पण तिथली फरशी नेहमीच पाणी आणि असिड यामुळे बुळबुळीत आणि निसरडी झालेली असते, त्यावरून तो घसरला आणि स्वत:ला सावरत असताना त्याच्या हातातली मेणबत्ती सुटली व जवळच असलेल्या थिनरच्या डब्यावर पडली. थिनरने पेट घेतला व डब्याचा स्फोट झाला. त्यात माझ्या मित्राचे पाय भाजले. त्याला बोरिवलीच्या भगवती इस्पितळात दाखल केलं व अंदाजे १५ दिवसांनी त्याला सोडणार होते. त्याला जिथे ठेवला होता तिथे वाफ, रसायनं, तेल आणि आग अशा वेगवेगळ्या कारणांनी भाजलेले रुग्णं ठेवले होते. तिथे नेहमी घाणेरडा वास येत असे. माझ्या नोकरीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच बोरीवली असल्याने मी दर २-३ दिवसांनी त्याला भेटायला जात असे.
असाच एकदा त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याच्या बाजूच्या खाटेवर उपडा झोपलेला व अॅसिडने अर्ध डोकं, खांदे व पाठ भाजलेला एक रुग्णं दोन दिवसांपूर्वीच दाखल झाला होता. अतीदक्षता विभागातून काढून २ दिवसांपूर्वीच त्याला जनरल वॉर्डमध्ये मित्र्याच्या मित्राच्या बाजूला ठेवला होता. थोड्या वेळाने त्याला भेटायला एक पस्तिशीतल्या बाई आल्या. त्या बाईनी त्याला औषधं पाजली, फळाचा रस काढून दिला व नंतर हळूवार हाताने त्याच्या जखमांवर मलम लावलं. तो रुग्णं उपडा झोपल्या झोपल्याच रडायला लागला व त्या बाईंची माफी मागू लागला. त्याला पाठीवर झोपता येत नसल्याने त्या बाईनी आणलेली वेताळ, मँड्रेक-लोथार, फ्लॅश गॉर्डनची इंद्रजाल कॉमिक्स जमिनीवर अशा रीतीने उघडून ठेवली की तो ती झोपल्या झोपल्या वाचू शकेल. त्याने ती वाचायला सुरुवात केली पण त्याचे डोळे भरून आल्याने त्या कॉमिक्सवर त्याचे अश्रू पडले व त्याने वाचन बंद केलं. मला उत्सुकता वाटल्याने मी मित्राला ‘काय प्रकार आहे’ असं खुणेने विचारलं. मित्राने जेव्हा हळूच सांगितलं की तो भुरटा चोर आहे तेव्हा माझी उत्सुकता आणखीच ताणली गेली. त्या बाई माझ्या मित्राशीही दोन वाक्य बोलल्या. त्या चोराची काळजी घ्या असं म्हणाल्या व थोड्या वेळाने निघून गेल्या. मित्राशी बोलताना त्या माझ्याशीही हसल्या होत्या. मी तेवढ्या छोट्या ओळखीचा फायदा उचलला व त्या बाई घरी जाण्यासाठी उठल्या तेव्हा मीही त्यांच्या मागेच गेलो व त्या बाहेर पडल्याबरोब्बर मी त्यांना गाठलं व माझं नांव वगैरे सांगून त्यांची हरकत नसल्यास मला त्या प्रकरणाची माहिती हवी असल्याचं सांगितलं. त्या बाईंनी त्यांच्या घराचा पत्ता देवून दुसऱ्या दिवशी घरी बोलावलं.
मालाडला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या बाईंनी जी माहिती सांगितली ती अशी :
त्यांचं नांव गोदावरी आहे. त्याला मालाडला एका चाळीत राहत होत्या. त्यांचे पती एका विद्युत ठेकेदाराच्या हाताखाली मुकादमाची नोकरी करत असत व नोकरीच्या निमित्ताने अनेक दिवस मुंबईबाहेर राहत असत. त्यांना मुलबाळ काहीही नसल्याने त्या घरात एकट्याच राहत असत. त्यांना शिवण येत असल्याने वेळा जावा म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी शिलाईचं काम सुरु केलं होतं व त्यांचा त्या व्यवसायात खूपच जम बसला होता. पण त्या जास्त काम घेत नसत कारण त्या कामाचा मुख्य उद्देश पैसे कमावणं हा नसून वेळ जाणं हा होता. त्यांच्या पतीलाही चांगला पगार होता त्यामुळे चाळीत ज्या काही ७-८ खोल्या होत्या त्यात सगळ्यांत सुखवस्तू म्हणून त्यांना गणलं जात असे.
चाळीतले सगळे पुरुष सकाळी कामावर जात असत व संध्याकाळी परत येत असत. बायका साधारण १२ च्या दरम्यान जेवणं आटोपून दुपारी २-३ तास झोप काढत असत. एवढ्या कडक उन्हात समोरच्या मैदानात मुलंही खेळत नसत त्यामुळे दुपारी नेहमीच तिथे सामसूम असे. अशाच एका रखरखीत दुपारी दोनच्या सुमारास जेव्हा त्या डुलकी काढत होत्या तेव्हा कोणीतरी दार वाजवलं. त्यांनी दार उघडून पाहिलं तर हातात बॅग घेवून एक विशीतला सेल्समन दारात उभा होता. रागानं ‘आम्हाला काही नको’ असं म्हणत त्या दार बंद करणार एवढ्यात त्या सेल्समनने त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. एवढ्या कडक उन्हात बिचाऱ्याला पोटासाठी वणवण करावी लागते असा विचार करत त्याची दया येवून त्या पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात जावू लागल्या. उघड्या दारातून तो सेल्समन चोराच्या पावलांनी कधी आत आला व त्यांच्या डोक्यावर कुठल्यातरी जड वस्तूचा फटका कधी मारला हे त्यांना कळलंच नाही. डोक्यातून एक जोरदार कळ आली व त्या बेशुद्ध पडल्या. बहुतेक त्या २-३ मिनिटांतच शुद्धीवर आल्या असतील कारण तो चोर अजूनही कपाटातल्या वस्तू हातातल्या बॅगेत भरताना त्यांना दिसला. त्याची गोदावरीबाईंकडे पाठ असल्याने त्या शुद्धीवर आल्या आहेत हे त्याला कळलंच नाही. आधी त्या जोरात ओरडणार होत्या पण तेवढ्यात त्यांचं लक्षं आतून कडी लावून बंद केलेल्या दाराकडे गेलं व त्यांना वाटलं की आपण जर ओरडलो तर तो आपल्याला पुन्हा एखादा फटका वर्मी मारून ठारही करेल. म्हणून जवळ जवळ अर्ध मिनिट त्या तशाच विचार करत पडून राहिल्या. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की खाली पडताना त्या बाथरूमच्या दारावर आदळल्या होत्या व त्यामुळे ते दार उघडलं गेलं होतं. त्यांनी विचार केला की बाथरूममध्ये जावून आतली कडी लावून जोराने मदतीसाठी आरडाओरडा करावा. पण तेवढ्यात त्यांना आठवलं की बाथरुमला आतून कडीच नव्हती. कारण अनेक दिवसांपूर्वीच ती निघाली होती व आज दुरुस्त करू, उद्या करू असं करताना ते राहूनच गेलं होतं. घरात त्या एकट्याच राहत असल्याने त्याची कधी गरजही भासली नव्हती त्यामुळे त्यांनी आळस केला होता त्याचा आता त्यांना पश्चात्ताप होत होता. काय करू काय करू असा विचार करत असतानाच त्यांचं लक्ष बाथरूममध्ये असलेल्या अॅसिडच्या बाटलीकडे गेलं. हलक्या पावलांनी त्या उठल्या व आत जावून ती बाटली घेवून त्या बाहेर आल्या. ती बाटली दोन्ही हातात पकडून त्यांनी डोक्यावर उचलली व हलक्या पावलांनी चोराच्या पाठीमागे जावून पूर्ण शक्तीनिशी ती चोराच्या डोक्यावर मारली.
बाटली डोक्यावर आदळताच ती फुटली व त्या चोराच्या डोक्यावर, खांद्यावर व मानेवर खोल जखमा झाल्या. त्यात त्याला अॅसिडने आंघोळच झाली. तो एवढ्या जोराने ओरडला की गोदावरी बाईंच्या कानठळ्याच बसल्या. नंतर तो चोर वेदनांनी एवढा बेभान झाला की निरुद्देश घरभर धावत सुटला. पुढल्याच क्षणी तो खाली पडला व हातपाय झाडत अंगावरचे कपडे फाडू लागला. पाण्यातून काढलेल्या माशासारखा तो तडफडत होता. तो एवढ्या जोराने हातपाय झाडत होता की त्याची लाथ लागून जवळच असलेलं टेबल खाली पडलं व त्यावरच्या वस्तू घरभर विखुरल्या गेल्या. भिंतीवर, फरशीवर जिथे जिथे अॅसिड पडलं होतं तिथे बुडबुडे व धूर येत असलेला पाहून गोदावरी बाई ‘आपल्या हातून हे काय भयंकर कृत्य घडलं’ असं वाटून सुन्नं होऊन उभ्या राहिल्या. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी दारावर धक्के देवून, कडी तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना दिसलं की गोदावरी बाई डोळे मोठे करून, कानावर हात ठेवून आ वासून उभ्या आहेत व एक माणूस जमिनीवर  पडून बेभान होऊन तडफडत आहे व अंगावरचे कपडे फाडत आहे. आत लालेल्या लोकांमध्ये बाजूलाच राहणारा व शास्र शाखेत शेवटच्या वर्षाला असणारा एक विद्यार्थीही होता. त्याचं फुटलेल्या अॅसिडच्या बाटलीकडे लक्षं जाताच क्षणार्धात त्याने झालेला प्रकार ओळखला व धावत बाथरूममध्ये जावून पाण्याने भरलेली बादली घेवून आला व आ त्या तडफडणाऱ्या चोरावर त्याने ती बादली उपडी केली. पाणी पडताच अॅसिडची तीव्रता कमी झाली व तो चोर ताळ्यावर आला व आरडाओरडा करायचा थांबला. पुढल्याच क्षणी गोदावरी बाई मटकन खाली बसल्या व धाय मोकलून रडू लागल्या. कोणीतरी जवळच्या डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेलं व दुसऱ्या कोणीतरी चहा बनवला व तो गोदावरी बाईंना देवून त्यांचं सांत्वन करू लागला. चोराच्या किंकाळ्या खूप लांबपर्यंत ऐकू गेल्या होत्या कारण लांबून लांबून लोकं काय झालं ते पहायला येत होती. चोराला दोघातिघांनी धरून फरपटत बाथरूममध्ये नेलं व भरपूर पाणी टाकून त्याच्या अंगावरचं अॅसिड धुवून टाकलं. तो अशा स्थितीत होता की त्याला धड उभंही राहवत नव्हतं. त्याच्या जखमांवर पाणी टाकलं की त्याला थंड वाटून बरं वाटत असे पण थोड्या वेळाने पाण्याचा त्रासही होऊ लागत असे. उघड्या जखमांमध्ये अॅसिड गेल्याने अजूनही तो तडफडतच होता.
५-१० मिनिटांतच जवळचे डॉक्टर आले. त्यांनी सगळा प्रकार ऐकून ही एम. एल. सी. (मेडिको लीगल केस) असल्याने पोलिसांना बोलावण्यास सांगितलं. त्यावर जमलेल्या सगळ्यांचं असं मत झालं की त्या चोराला झाली तेवढी शिक्षा खूप झाली आता आणखी पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात देणं म्हणजे पाप करण्यासारखंच आहे. पण डॉक्टर म्हणाले की त्याची स्थिती चिंताजनक आहे व लवकर मोठ्या इस्पितळात न हलवल्यास तो मरूही शकतो व त्यासाठी पोलिसांना  कळवून पंचनामा करणं जरुरीचं आहे. मग कोणीतरी पोलिसांना कळवायला गेलं. तो चोर पोलिसांचं नांव ऐकून काय म्हणतो हे पाहण्यासाठी गोदावरीबाईंनी त्याच्याकडे पाहिलं तर तो बेशुद्धीत काहीतरी बडबडत डोळे फिरवून पडलेला दिसला. तो कसलीही काळजी करण्याच्या पलीकडे गेलेला होता. थोड्या वेळाने दोन हवालदार आले व सगळं ऐकून घेतल्यावर त्यातल्या एकाने कचकन त्या चोराच्या कुशीत लाथ घातली. बेशुद्धीतही तो विव्हळला पण त्याच्या तोंडून फक्त घरघरच ऐकू आली. ते पाहून गोदावरीबाई कळवळल्या व त्या हवालदाराला अडवायला गेल्या तर तो म्हणाला, ए बाई, तू काय बाई हायेस का सैतान? तुझ्या पोराच्या वयाचा तो. चोर असला म्हणून काय झालं? त्याच्यावर अॅसिड फेकायचं का? आणि आम्ही नुसती लाथ घातली तर कशाला कळवळून दाखवतेस? नाटकी मेली.”  यथावकाश पंचनामा झाला व त्याला बोरीवलीच्या भगवती इस्पितळात हलवला. सुरुवातीचे काही दिवस तो अती दक्षता विभागात होता. पण नंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये माझ्या मित्राच्या शेजारी हलवला.
तो चोर दहिसरच्या झोपडपट्टीत राहत होता. इस्पितळात त्याला पहायला कोणीही आलं नाही. आपल्या हातून नकळत पाप घडलं आहे व त्याचं परिमार्जन झालंच पाहिजे या भावनेने गोदावरीबाई दिवसांतून दोन वेळा त्याला भेटायला जात असत व मग त्यांच्यात एकमेकांची माफी मागायची शर्यत लागत असे. बाईंना त्याच्यावर कुठलीही केस करायची नव्हती. पण आता उपयोग नव्हता कारण आधीच पोलीस केस झाली होती. बाई मला म्हणाल्या की त्या कोर्टात खरं ते सांगणार आहेत व अशी विनंतीही करणार आहेत की त्याला कुठलीही शिक्षा होऊ नये. एवढे दिवस बाईनी त्याला पोटच्या मुलासारखा सांभाळला होता व ते पाहून तो चोर रडत असे. बाईंची सगळी कहाणी ऐकून मी त्यांचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी मी मित्राला भेटायला गेलो तेव्हा त्या चोरालाही भेटलो व त्याच्याशी गप्पा मारू लागलो. नंतर त्याच्या खाटेशेजारी जमिनीवर मांडी घालून बसलो व त्याच्याशी पत्तेही खेळलो. तो खातेवर पालथा झोपल्या झोपल्या माझ्याशी खेळला. खेळताना तो खुष झाला. मी कधीच रमी खेळत नाही. पण त्याला बरं वाटावं म्हणून त्या दिवशी खेळलो. सगळे डाव तोच जिंकला. नंतर डॉक्टर आले व त्यांनी माझ्या मित्राला त्याच दिवशी डिस्चार्ज देणार असल्याचं सांगितलं. हे ऐकून त्या चोराला दु:ख झालं कारण मी त्याला यापुढे भेटणार नाही असं त्याला वाटलं. पण मी त्याला म्हणालो की तू ही माझा मित्रच आहेस व मी तुला भेटायलाही येत जाईन. जवळ जवळ तीन महिने तो तिथे होता व आठवड्यातून २-३ वेळा तरी मी त्याला भेटायला जात असे. एकदा मला तो पट्कन म्हणाला, मिलन  भाय, साला तेरे जैसा अपने जैसे फालतू चोरको भी इज्जत देनेवाला यारदोस्त मिलता और गोदाबाय जैसी प्यार करनेवाली मां मिलती तो अपन कभी भी चोर नही बनता. साला इस्कुल जाकर बडा आदमी बनता. या फिर हमाली करता पर चोरी कब्बीच नही करता. बचपनसे साला जिसनेभी देखा अपने को कुत्ते के माफिकही समझा. जो आया वो बोला के तू साला फालतू है. मारा, गाली दिया, भुखा रखा. प्यार किसीने नही किया करके आक्खा दुनियाके उपर अपना खुन्नस बैठ गया. ये पैली बारच कोई तेरे जैसा इंजनेर अपनको मिलनेके वास्ते आता है और गोदाबाय मां के माफिक प्यार करता है. एवढं बोलून तो एकदम लहान मुलासारखा रडायलाच लागला. मी त्याची समजूत घालून निघालो तेव्हा माझ्याही डोळ्यांत पाणी होतं.
त्याच्या जखमा भरत असत व पुन्हा चिघळत असत. त्याच्या मागच्या बाजूने अर्ध डोकं म्हणजे  पूर्ण चकोट झाला होता व त्यावरची कातडी लालसर व वेडीवाकडी राहिली होती. मान व पाठीवरची कातडीही तशीच वेडीवाकडी राहिली होती. त्यामुळे जेव्हा डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला तेव्हा तो व गोदावरीबाई दोघांनाही आश्चर्यच वाटलं. कारण त्यांना वाटत होतं की डॉक्टरी उपायांनी तो पुन्हा पहिल्यासारखा होईल. त्यांच्या मताप्रमाणे तो अजूनही पूर्ण बरा व्हायचा होता. पण डॉक्टरांनी सांगितलं की आता आयुष्यभर त्याची कातडी तशीच राहणार आहे. कारण अॅसिडने भाजलेली कातडी कधीच पहिल्यासारखी होत नाही. हे ऐकताच तो चोर व गोदावरी बाई दोघेही खूप रडले व दोघांची समजूत घालता घालता माझी पुरेवाट झाली. आपल्या हातून घडलेल्या पापाचं परिमार्जन झालं आहे असं वाटत असतानाच त्याला सगळं आयुष्यं असंच कुरूप रहावं लागणार म्हणून बाईंना फारच वाईट वाटत होतं. पण त्याला इस्पितळात आता राहता येणं शक्य नसल्याने त्यांनी इस्पितळ सोडलं व घरी गेले. त्या चोराचं घर मला माहिती नसल्याने त्यानंतर एकदा मी गोदावरी बाईंना भेटायला गेलो व त्या चोराची  विचारपूस केली. त्या म्हणाल्या की तो चोर काही केल्या दहिसरच्या झोपडपट्टीतला त्याच्या घराचा पत्ता देत नाही. तो म्हणतो की तोच दर एक-दोन दिवसाआड त्यांना भेटायला येईल. मी त्यांचा निरोप घेतला व पुन्हा २-३ दिवसांनी जेव्हा तो चोर त्यांच्या घरी येणार होता तेव्हाच मी ही येण्याचं कबूल केलं व निघालो.
ठरलेल्या दिवशी मी गोदावरीबाईंकडे जावून तासभर थांबलो पण तो चोर काही आलाच नाही. बाईनी त्या चोराला ‘दिनेश’ असं नांव ठेवलं होतं. गप्पा मारता मारता बाई मला म्हणाल्या, अहो चौबळ साहेब, तुम्हाला काय सांगू लोकं किती वाईट असतात ते. ह्या जवळपासच्या दोन-तीन चाळीत आमच्याच जवळ सगळ्यांत जास्त पैसे आहेत. नेहमी कोणी ना कोणी अडचणीत पडल्यावर आमच्याकडे पैसे मागायला येतात व एवढी वर्ष झाली आम्हीही जेवढी शक्य होईल तेवढी मदत सगळ्यांना करतो. पण हा प्रसंग घडल्यावर मला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात आजूबाजूच्या बायका मला टोमणे देत असतात. ‘मी अॅसिड फेकण्याएवढी दुष्ट असल्यानेच मला मूल झालं नाही’ असंही म्हणतात. मला टोमणे मारणाऱ्यांपैकी कित्येकांना मी ऑपरेशनसाठी, जीवावरच्या दुखण्यातून उठण्यासाठी, लग्नं कार्यासाठी पैसे दिलेले आहेत. बऱ्याच लोकांचे पैसे अजून परतही आलेले नाहीत. अनेकांसाठी मी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस केलेला आहे. अशी लोकंही मला टोमणे मारतात म्हणून मला आता इथे राहणं फारच कठीण झालं आहे. माझे पती परत आल्यावर मी इथून दुसरीकडे कुठेतरी रहायला जाण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. खरं तर मला इथून जावंसं वाटत नाही. ह्या जागेत जीव अडकून राहिला आहे. शिवाय दिनेशसाठीही अजून काहीतरी करावंसं वाटतंय. त्याच्या आयुष्याची माझ्यामुळे बरबादी झाली. नकळत का होईना पण मी त्याला साफ विद्रूप करून टाकला. त्याच्यासाठी कितीही केलं तरी परिमार्जन होईल असं मला वाटत नाही. मला ते ऐकून वाईट वाटलं. त्यांना सहानुभूती दाखवून मी त्यांचा निरोप घेतला. त्यांनंतर महिनाभर काही तिथे जायला मला जमलंच नाही. महिनाभराने मला बाईंनी ऑफिसात फोन केला व संध्याकाळी जमल्यास घरी या असं सांगितलं. मी ‘बघतो’ असं म्हणालो पण कामामुळे मला जायला काही जमलंच नाही.
८-१० दिवसांनी तिथे गेलो तर दाराला कुलूप होतं. मी शेजारी चौकशी केली तेव्हा ती बाई म्हणाली, कोण ती वांझोटी गोदा ना? काय माहिती कुठे उलथलिय ते. गेली असेल कुठेतरी अॅसिड फेकायला. तिथून निघालो व नाक्यावर वासुगिरी करत असलेल्या माझ्याच वयाच्या मुलांना जाऊन गोदावरी बाईंबद्दल विचारलं. त्यांच्याशी बोलताना माहिती कळली की मला जेव्हा त्यांनी फोन केला होटा त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी घर सोडलं. घर सोडण्यआधी मला भेटून त्यांना मला ‘त्या चोराची काळजी घ्या’ असं सांगायचं होतं. ती पोरं म्हण्लाली की बाईंनी नवीन जागा कुठे घेतली आहे ते कोणालाच सांगितलं नाही हे बरंच केलं कारण इथे राहणाऱ्या कृतघ्न लोकांनी त्यांना तिथेही जाऊन छळलं असतं. तो चोर बाईना भेटायला येत असे ते सहन न होऊन काही ‘समाजसेवकांनी’ त्याला परत तिथे दिसलास तर पोलिसांच्या ताब्यात देईन अशीही धमकी दिली होती व बाईंनाही सांगितलं होतं की चोराचिलटांना घरात बोलवायची एवढी ‘खाज’ असेल तर जागा खाली करा व दुसरीकडे कुठेही जावून थेरं करा. ती मवाली पोरं सगळ्या समाजसेवकांची आई बहीण उद्धारत मला म्हणाली, “अरे यार आजकाल चांगल्याची दुनिया नाही. बाई इथून गेल्या ते बरंच झालं. ह्या लोकांनी लुटलं बिचारीला. एखाद्याला जेव्हा पैशांची गरज लागेल ना तेव्हा यांना बाई आठवतील. कोण काय करतंय त्याच्याशी ह्या समाजसेवकांना काय करायचं आहे? सगळ्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये नाक खुपसतात. आम्ही फक्त आम्हाला लाईन देणाऱ्या चालू पोरींचीच भंकस करतो. चांगल्या पोरींकडे आम्ही बघतही नाही त्यात ह्या समाजसेवकांचं काय जातं. भडवे आम्हाला पण दादागिरी दाखवतात.” मी हसत हसत त्याच्या खांद्यावर थाप मारली व तिथून निघालो. मवाली वाटत असली तरी त्या पोरांकडे जो चांगुलपणा होता तो ‘तथाकथित’ समाजसेवक व बाईंच्या शेजाऱ्यांकडे नव्हता.
पुढे अनेक वर्ष गेली. कधीकधी बाई व त्या चोराची आठवण येत असे. बाईना परिमार्जनाची सह्डी संधी मिळायला हवी होती असं नेहमी वाट असे. नंतर दहिसरला राहण्याऱ्या एका पोलिसाशी ओळख झाल्यावर त्याला त्या चोराची माहिती काध्याला सांगितली. त्याने काही दिवसांनी भेटून सांगितलं की त्यां फार पूर्वीच चोऱ्या करण्याचं सोडलं होतं व न्त्त्र तो कुठे गेला हे कोणालाच माहिती नाही. त्या दोघांचं पुढे काय झालं हे शेवटपर्यंत कळलच नाही.
पुढे ती नोकरी सोडून मी दुसरीकडे लागलो. आधी ड्राफ्ट्समन, मग इंजिनिअर व अगदी शेवटी मॅनेजर अशा एक एक पोस्ट वर चढत गेलो. नोकऱ्या बदलत गेलो, तसं जुन्या सहकाऱ्यांकडे येणं जाणंही कमी झालं. कुवेतला येण्याच्या वर्षभर आधी मी एका मोठ्या विद्युत कंट्रोल पॅनेल्स बनवणाऱ्या कंपनीत नोकरी करत असताना तिथल्या एका शिपायाने लोअर परेलची चाळीतली अगदी छोटी जागा विकून मालाडला चाळीतच पण मोठी जागा घेतली होती व त्याने तिथे सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. सगळ्या स्टाफच्या लोकांना त्याने आमंत्रण दिलं होतं. तिथे गेल्यावर तो परिसर पाहून मला एकदम ८-१० वर्षांपूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. तो शिपाई जिथे रहायला गेला होता ती जागा गोदावरीबाईंच्या समोरच असलेल्या चाळीत होती. जमलेल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये मी ८-१० वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेची चौकशी केली. सगळ्यांनी कानावर हात ठेवले. २-३ दिवसांनी त्या शिपायाने मला पुन्हा त्याच्या घरी काहीतरी ‘अर्जंट’ कामासाठी बोलावून घेतलं म्हणून गेलो. मी गेल्यावर मला चहापाणी देवून तो पट्कन बाहेर जावून कोणाला तरी घेवून आला. मला भेटायला जो माणूस आला होता त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं पण कुठे ते आठवत नव्हतं. त्याने आठवण करून दिल्यावर आठवलं की ८-१० वर्षांपूर्वी अगदी शेवटी मी जेव्हा गोदावरी बाईंना भेटायला आलो होतो व नाक्यावर वासुगिरी करणाऱ्या मुलांकडे चौकशी केली होती त्यात तो ही होता. तो साफ बदलून गेला होता. त्याच्या डोक्यावरचे बरेचसे केसही गेले होते. माझ्यात मात्र इतक्या वर्षानंतरही फारसा फरक पडलेला नव्हता म्हणून त्याने मला पूजेच्या दिवशी पाहिलं होतं तेव्हा त्यालाही मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं पण कुठे ते आठवत नव्हतं. पण मी जेव्हा गोदावरीबाई व तो चोर यांची चौकशी केली तेव्हा मात्र त्याला सगळं आठवलं व त्याने पुजेची गर्दी आटोपल्यावर २-३ दिवसांनी त्या शिपायाजवळ मला निरोप पाठवला होता.
त्याच्या बोलण्यावरून कळलं की गोदावरी बाई गुजराथला रहायला गेल्या होत्या व त्यांनी नंतर दिनेशला (त्या चोराला) तिथे बोलावून घेतलं होतं. बाई, त्यांचा पती व दिनेश असे ते तिघेही एकत्र राहत होते. नंतर वर्षभरातच त्यांच्या पतीने नोकरी सोडून स्वत:चा विद्युत ठेकेदारीचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला व दिनेश त्यांना मदत करू लागळा. त्यांचं नशीब एवढं चांगलं की महाराष्ट्र सरकारच्या काही निर्णयांमुळे बऱ्याच कंपन्या महाराष्ट्रातून गुजराथला हलवल्या गेल्या व त्यामुळे गुजराथला विद्युत ठेकेदारी करणाऱ्या ठेकेदारांचा व्यवसाय एकदम अनेक पटींनी वाढला. त्यानंतरच्या ३-४ वर्षांतच त्यांना एवढी कमाई होऊ लागली की त्यांनी स्वत:चं मोठं घरही बांधलं व मोटारसायकलही घेतली. गोदावरी बाईना मूल झालं नाही म्हणून त्यांनी त्या चोराला कायदेशीररित्या दत्तक घेण्याचाही प्रयत्न केला. पण ह्या बाबतीत आपल्या सरकारचे कायदे एवढे कडक आहेत की ३-४ वर्ष प्रयत्न करूनही त्या काही शेवटपर्यंत त्याला कायदेशीररीत्या दत्तक घेऊ शकल्या नाहीत म्हणून त्यांनी तो नादच सोडला. चांगले पैसे आल्यावर त्यांनी दिनेशला शिकवायला घरी शिक्षक ठेवला. त्याचं तिसरीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. पुढलं दहावीपर्यंतचं शिक्षण त्याने कुठलीही परीक्षा न देता घरी शिक्षक बोलावून घेतलं. ५-६ वर्षांतच त्या तिघांचं सारं जगच बदलून गेलं. डोक्यामागचं टक्कल दिसू नये म्हणून दिनेशने खास टोप बनवून घेतला. नंतर काही कामासाठी तो मुंबईला आला असताना त्याने माझ्या  ऑफिसातही फोन केला होता पण मी तेव्हा तिथली नोकरी सोडून दुसरीकडे गेलो होतो. म्हणून तो गोदावरी बाई जिथे राहत होत्या तिथल्या चाळीत आला व नाक्यावर वासुगिरी करत उभ्या असलेल्या मुलांना भेटला. आधी त्याला कोणी ओळखलंच नाही पण त्याने ओळख सांगताच ती टवाळ पोरं सगळी एकदम खुष झाली व बाजूच्याच चहाच्या टपरीत त्याला घेवून गेली व तासभर गप्पा मारत बसली. त्याची प्रगती ऐकून सगळ्यांनाच बरं वाटलं. नंतर त्याने माझं नांव सांगून मी कधी भेटलोच तर हे सगळं मला सांगावं कारण मी त्याचा हितचिंतक असल्याने मला बरं वाटेल असं सांगून त्याचा फोन नंबर व व्हिजिटिंग कार्ड देवून निघून गेला.
सगळी कहाणी ऐकून मला बरं वाटलं मी त्या माणसाकडून त्यांचा पत्ता मागितला. त्याने बरीच वर्ष झाल्याने तो हरवला असल्याचं सांगितलं व माझी माफी मागितली. मी नेहमी ऑफिसच्या कामासाठी गुजराथला जात असल्याने त्यांचा पत्ता मिळाला असता तर तिघांनाही भेटू शकलो असतो. मी त्याचे आभार मानून निघालो. गोदावरी बाईंच्या खोलीसमोरून जाताना अनेक वर्षांपूर्वी पाहिलेल्या अॅसिडच्या भिंतीवरच्या खुणा, इस्पितळात पोटावर झोपलेला तो चोर, गोदावरीबाईंचा चांगुलपणा ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या. आता तिथे कोणीतरी मारवाडी कुटुंब रहायला आलं होतं. बाईंच्या एकेकाळच्या नीटनेटक्या खोलीत पसारा पडला होता. चिलीपिली रडत होती, घरमालकिण पोरांवर ओरडत होती. घरभर घाण होती. एक उग्र दर्प त्या खोलीसमोरून जाताना आला. एकेकाळची ती शांतता, स्वच्छता, आपलेपणा आता तिथे नावालाही नव्हता. बाईंच्या खोलीची त्या नव्या मालकांनी साफ वाट लावून टाकली होती. त्या छोट्याश्या वास्तूची ती दशा पाहून वाईटही वाटत होतं व बाईना परिमार्जन करण्याची संधी मिळाली व त्यांनी त्या संधीचं सोनं केलं म्हणून समाधानही होत होतं. पण त्या तिघा देवमाणसांचा पत्ता मिळाला नाही ही रुखरुख अजूनही आहे.

*********************
पत्ता : मिलिंद चौबळ.
खोली क्र. ५, घर क्र. ८६,
मु. पो. उंबरपाडा (सफाळे),
ता. व जिल्हा : पालघर,
पिन : ४०११०२.

दूरध्वनी : ८८३०६९१७०९ (WhatsApp).
दूरध्वनी (युरोप) : (+३५१) ९२०१४१५८०.



2 comments:

  1. छान लिहिले आहे

    ReplyDelete
  2. घटनाच हृदयस्पर्शी आहे त्यामुळे लेखन चांगलं वाटतं.

    ReplyDelete